flood protection:पूरसंरक्षण भिंतीची माती चोरणाऱ्यावर गुन्हे दाखल

Filed a case against the thief who stole the soil of the flood protection wall




✍️नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: गीतानगर परिसरातील विवेकानंद आश्रम मागील पूरसंरक्षण भिंतीची माती खोदणाऱ्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन माजी महापौर मदन भरगड यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे दिले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेवून, आरोपी राजेंद्र गोळे यांच्या विरुद्ध सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम, १९८४ अंतर्गत कलम ३ अन्वये जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.



सरकारच्या वतीने पाटबंधारे विभाग उपविभागीय अधिकारी अनिल राठोड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. विवेकानंद आश्रमच्या मागील गीतानगर, अकोला येथील मोर्णा नदीच्या काठावरील  पुरसंरक्षणभिंत तोडून माती चोरून नेणाऱ्यावर पोलिस कार्यवाही होऊन गुन्हे दाखल करण्यात यावे,अशी लेखी तक्रार राठोड यांनी दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून गुन्हे दाखल केले आहेत. तपास अधिकारी महेंद्र देशमुख प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.




मोर्णा नदीला पूर आल्यास पुराच्या पाण्याचा गीतानगर भागात शिरकाव होत होता. यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून पूरसंरक्षण भिंत बांधली होती. परंतू, सध्या येथील पूरसंरक्षण भिंतीची माती जेसीबीने खोदून इतरत्र नेण्यात येत आहे. यामुळे ही पूरसंरक्षणभिंत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही भिंत पडल्यास गीतानगर भागातील नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे, तरी याप्रकरणी आपण त्वरित जेसीबीने माती खोदणा-यावर कारवाई करावी, असे निवेदन माजी महापौर मदन भरगड यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, मनपा आयुक्त,जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे सोपविले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेवून,संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.


हे सुध्दा वाचा: पूरसंरक्षण भिंतीची माती खोदणा-यावर कारवाई करावी- मदन भरगड


टिप्पण्या