kashid-beach-tragedy-raigad: काशीद बीचवर अकोल्यातील कोचिंग क्लास संचालक आणि विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; शैक्षणिक सहल काळात हृदयद्रावक घटना!





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीद बीचवर शनिवारी सायंकाळी अकोल्यातील शिक्षक तथा कोचिंग क्लास संचालक आणि विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही दुर्घटना शैक्षणिक सहलीदरम्यान घडल्याने अकोल्यात शोककळा पसरली आहे.


अकोल्यातील ‘शुअर विन (Sure Win) कोचिंग क्लासेस’ या नामांकित संस्थेतील १२ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांचा गट शैक्षणिक सहलीसाठी काशीद बीचवर गेला होता. समुद्रात पोहत असताना अचानक आलेल्या जोरदार लाटेमुळे तीन जण पाण्याच्या प्रवाहात अडकले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी सुखरूप वाचवण्यात आला.


या घटनेत शिक्षक तथा क्लास संचालक प्रा. राम उर्फ लहू कुटे (वय अंदाजे ६०, रा. सुधीर कॉलनी, जवाहरनगर, अकोला) आणि विद्यार्थी आयुष रामटेके (वय अंदाजे १९, रा. अकोला) यांचा मृत्यू झाला आहे. तर आयुष बोबडे (वय अंदाजे १७) हा सुखरूप बचावला असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी सांगितले.


मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, राम कुटे यांचा मृतदेह बोर्ली येथे तर आयुष रामटेकेचा मृतदेह मुरुड प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या घटनेनंतर स्थानिक पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला.


राम कुटे हे अकोल्यातील ‘शुअर विन कोचिंग क्लासेस’चे संचालक व विद्यार्थी प्रिय  शिक्षक होते. त्यांनी बारा ज्योतिर्लिंग परिसरात क्लास सुरू केल्यानंतर तोष्णीवाल लेआउट आणि बुलढाणा येथेही शाखा सुरू केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवले. त्यांच्या अकस्मात निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.


प्रा. राम कुटे यांच्या पश्चात पत्नी सविता कुटे, एक मुलगा सुमित आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेनंतर काशीद बीचवरील सुरक्षा आणि बचावव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.



या पोस्ट ठरल्या अखेरच्या


प्रा. राम कुटे यांनी सहलीतील एक फोटो त्यांच्या facebook page वर अपलोड केला. तत्पूर्वी, मुलगा सुमित याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या दोन्ही पोस्ट त्यांच्या अखेरच्या पोस्ट ठरल्या…




News Points 


काशीद बीच दुर्घटना 

अकोला शिक्षक मृत्यू

शुअर विन क्लासेस 

रायगड बीच अपघात 

शिक्षक विद्यार्थी बुडाले

Akola Sure Win Coaching Accident 

Kashid Beach Death News



भावपूर्ण श्रद्धांजली 


प्रा.राम कुटे सर यांना भारतीय अलंकार न्यूज 24 परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 


-ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

मुख्य संपादक

भारतीय अलंकार न्यूज 24






टिप्पण्या