vidarbha-election-vitex-2026: गाव तेथे उद्योजक ही संकल्पना चेंबरने अमलात आणावी- पंकज भोयर; विदर्भ चेंबरच्या विटेक्स 2026 प्रदर्शनीचा थाटात प्रारंभ
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने "गाव तेथे उद्योजक' ही नवकल्पना अमलात आणली असून, याचा विदर्भ चेंबरने पाठपुरावा करून गावागावात नव उद्योजक निर्माण करावे. यासाठी केंद्र व राज्य शासन सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्स एन्ड इंडस्ट्रीच्या वतीने व मुख्य प्रायोजक मार्वल ट्रिनीटी रियल एस्टेट एलएलपी व सह प्रायोजक विठ्ठल ऑईल असणाऱ्या विटेक्स प्रदर्शनीचा शुक्रवारी ना.भोयर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यात ते मार्गदर्शन करीत होते.
ते पुढे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली हे शहर उद्योगधंद्याच्या क्षेत्रात सर्वतोपरी अव्वल असून त्याचप्रमाणे अकोला शहर ही उद्योग धंद्याच्या संदर्भात अव्वल असल्याचे सांगितले. हा जिल्हा कृषीक्षेत्र व कृषी अनुसंधान मध्ये अव्वल असून औद्योगिक क्षेत्राची कक्षा वाढविणे आवश्यक असून केंद्राकडून काही आणता येईल काय याचाही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करणार आहे.
चेंबरच्या वतीने आयोजित या प्रदर्शनीची त्यांनी प्रशंसा करीत आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात. विदर्भ चेंबरचे अध्यक्ष व प्रदर्शनीचे संयोजक निकेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेत सम्पन्न या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, मार्वल ट्रिनीटीचे संचालक सुनील ईंण्णानी, कालूराम फुडसचे संचालक शिवप्रकाश रुहाटीया, पुण्याचे जेष्ठ उद्योजक चंद्रकांत ठक्कर, कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक दालमिया, अकोला इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, चेंबरचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल, चेंबरचे सचिव निरव वोरा, वरीष्ठ उपाध्यक्ष सिद्धार्थ रुहाटीया, कनिष्ठ उपाध्यक्ष निखिल अग्रवाल, कोषाध्यक्ष किशोर बाछुका, सहसचिव किरीट मंत्री, सहसंयोजक राहुल मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनीची फीत कापून, आकाशात फुगे उडवुन, चेंबरचे संस्थापक विदर्भ केसरी स्वर्गीय ब्रजलाल बियाणी यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने या सोहळ्याचा थाटात प्रारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवर अतिथींचा स्मृतीचिन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी करून चेंबरच्या एकंदर उपक्रमांची माहिती देत ऑनलाईनच्या या गराड्यात पारंपारिक उद्योग धंद्यांना जपण्यासाठी चेंबरच्या वतीने लोकल टू ग्लोबल ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे सांगितले.
यावेळी विठ्ठल ग्रुपचे संचालक शिवप्रकाश रूहाटीया यांनी संबोधित करीत उद्योग बिना खरा पुरुषार्थ होवू शकत नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, उद्योग हा भाग्याचा खेळ नसून कष्टाने सर्व काही प्राप्त होऊ शकते. उद्योगात यश अपयश हे येतच असते. मात्र अपयशाला खचून न जाता नव्या जोमाने उद्योग, व्यापार करून आपले औद्योगिक विश्व घडवावे असे आवाहन केले.
यावेळी मारवल ट्रिनिटीचे संचालक सुनील इंन्नानी यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत विटेक्स प्रदर्शनी वास्तवतेची खरी प्रदर्शनी असल्याचे सांगितले. ऑनलाइनच्या जमान्यात वस्तूची सत्यता ओळखता येत नाही. मात्र अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण वस्तू चोखंदळ पणे पाहू शकतो यासाठी असे उपक्रम सातत्याने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी आपल्या मार्गदर्शनात अशा प्रदर्शनीची उपयुक्तता प्रतिपादित केली. बायर व सेलर यांचे मनोमिलन अशा प्रदर्शनीत होत असते. अकोल्यासारख्या मध्यम शहरात एवढे मोठे प्रदर्शन आयोजित करणे ही व्यापारी व उद्योजकांच्या एकतेची मोठी उपलब्धी असून आज व्यापार उद्योगासमोर आर्टफिशल इंटेलिजन्स चे मोठे आव्हान उभे झाले आहे.ते कामगार ही संज्ञा गिळंकृत करू पाहत आहे.
एआय चा वापर व्यापारी उद्योजकांनी जाणीव पूर्वक करावा. एकीकडे ऑनलाइनच्या माध्यमातून संपूर्ण बाजार हा पुढ्यात आला आहे. पारंपारिक व्यापारांसाठी हा मोठा धोका असून तो धोका व्यापाऱ्यांनी ओळखून आपल्या व्यापाराला नव्या अविष्कारात गती द्यावी. नम्रता व लवचिकता व्यापारात आवश्यक असून याचा उपयोग करावा. त्याचप्रमाणे गाव तेथे उद्योजक ही संकल्पना महाराष्ट्र चेंबरने निर्माण केली आहे. यासाठी ही विदर्भातील उद्योजकांना सहकार्य करण्यासाठी व ही संकल्पना जोमाने सुरू करण्यासाठी चेंबर गावातील उद्योजकांना प्रोत्साहन देणार आहे. आर्थिक कमकुवत, होतकरू उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी आपण योग्य ते सहकार्य करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार अनुप धोत्रे यांनी आपल्या मार्गदर्शनात उद्योग निर्मितीसाठी केंद्र शासनाने अनेक योजना व बँका समवेत अनेक उपक्रम निर्माण केले आहेत. त्याचा व्यापारी, उद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. जिल्ह्याला औद्योगिक विकासाच्या दृष्टीने प्रगत करण्याचा संकल्प व्यापारी उद्योजकांनी घेतला आहे. ही भूषणावह बाब असून 2047 पर्यंत विकसित भारताचे खरे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे खा धोत्रे यांनी यावेळी सांगितले.
या उद्घाटन सोहळ्याचे बहारदार संचालन चेंबरचे सचिव निरव वोरा यांनी तर आभार प्रदर्शनीचे सहसंयोजक राहुल मित्तल यांनी मानलेत.
प्रदर्शनीत दुपारी आयोजित तांत्रिक कार्यशाळेत विविध तज्ञांची कार्यशाळा संपन्न झाली. यात सुहास बुद्धे नागपूर हयानी लोकल टू ग्लोबल या विषयांवर स्थानीय उत्पादन जागतिक बाजारात कसे न्यावे, यावर व्याख्यान दिले.
या नंतर सीए यशवंत भोजवाणी नागपूर यांनी एमएसएमई मध्ये शासकीय सबसिडी, सरकारी अनुदानातून उद्योगाला कशी गती द्यावी व एमएसएमई मध्ये संधी यावर मार्गदर्शन केले.
शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता प्रदर्शनीत चेंबरच्या महिलांच्या वतीने विदर्भ किचन क्वीन स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात ट्रॉफी व शील्ड पुरस्कार ठेवण्यात आले असून, महिलांनी आपापल्या घरून आधुनिक पारंपरिक पदार्थ या स्पर्धेत आणावेत याचे परीक्षण हार तज्ञ प्राध्यापक नीलिमा टिंगरे तथा महाराष्ट्र किचन कॉइनच्या विजेत्या रजनी आहे करणार आहेत. ही स्पर्धा बालाजी केटरिंग निल रत्न ब्युटिक रुक्माई सर्विस सेंटर तथा स्मेश परफ्युम तर्फे विजेत्या महिलांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे तर सहभागी महिलांना वी टॅक्स प्रदर्शनीच्याच्या वतीने प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहे.
दुपारी 4 वाजता तांत्रिक कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत हैदराबाद येथील आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ञ श्रीमती स्नेहल बडोतकर या व्यापारासाठी आर्टफिशीयल इंटेलिजन्सचा मार्ग यावर तथा मुंबई येथील डिजिटल मार्केटिंग तज्ञ अश्विनी देसाई या व्हाट्सअपच्या माध्यमातून व्यापार या विषयावर कार्यशाळा सादर करणार आहेत. यात प्रमुख पाहुणे महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्ष संगीता पाटील व स्टेट टॅक्स विभागाच्या उपायुक्त अर्चना चव्हाण व प्रकल्प प्रमुख दिपाली देशपांडे, रजनी महाले, रविता शर्मा, लीना आर्या उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनीचा व तांत्रिक कार्यशाळांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन विटेक्स प्रदर्शनीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी आयोजन समितीचे समस्त पदाधिकारी सदस्य व्यापारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने या उद्घाटन सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या आयोजनच्या सफलतेसाठी आयोजन समिति सदस्य अहोरात्र प्रयत्न करत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा