mayor-election-akola-city-bjp-: अकोला महापालिकेवर भाजपची सत्ता; शारदा खेडकर महापौर, अमोल गोगे उपमहापौर

45 विरुद्ध 32 मतांनी विजय; AIMIM तटस्थ, सभागृहात काँग्रेस–AIMIM मध्ये जोरदार गोंधळ




 ठळक मुद्दे (News Highlights)


▪️ अकोला महापालिकेत भाजपने बहुमताचा आकडा गाठत सत्ता मिळवली

▪️ शारदा रणजीत खेडकर महापौर, अमोल सुधाकर गोगे उपमहापौर

▪️ दोन्ही पदांसाठी 45 मते बाजूने, 32 विरोधात

▪️ AIMIM चे 3 नगरसेवक तटस्थ

▪️ काँग्रेस–AIMIM नगरसेवकांमध्ये सभागृहात राडा

▪️ बांगड्या फेकण्याचा प्रकार; पोलिसांचा हस्तक्षेप




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. भाजप प्रणित शहर सुधार समितीच्या शारदा रणजीत खेडकर यांची अकोला महापालिकेच्या महापौरपदी बहुमताने निवड झाली, तर अमोल सुधाकर गोगे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.



MIM च्या भूमिकेमुळे BJP ला सत्ता!


महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांसाठी 45 मते बाजूने, 32 मते विरोधात पडली. AIMIM चे 3 नगरसेवक तटस्थ राहिले. या तटस्थ भूमिकेमुळे भाजपला सत्ता मिळवणे सोपे झाले, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.


सुरेखा काळे व आझाद खान यांचा पराभव


महापौर पदाच्या निवडणुकीत शारदा खेडकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव केला.



उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांनी काँग्रेसचे उमेदवार आजाद खान यांचा 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव केला.


तिघे तटस्थ  


या निवडणुकीत AIMIM चे नगरसेवक सीमा अंजुम शेख अनीस (प्रभाग 2-अ), मैमूना बी. अब्दुल रशीद (प्रभाग 2-क) आणि सैयद रहीम सैयद हाशम (प्रभाग 2-ड) यांनी तटस्थ भूमिका घेतली.



निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, नगर सचिव अमोल डोईफोडे, गणना अधिकारी विजय पारतवार, दिलीप जाधव व निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे उपस्थित होते.



बांगड्या फेकण्याचा प्रकार


दरम्यान, AIMIM च्या तटस्थ भूमिकेवरून काँग्रेस नगरसेवक आक्रमक झाले. सभागृहात काँग्रेस व AIMIM च्या नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की नगरसेवक एकमेकांवर धावून गेल्याची चर्चा आहे. यावेळी बांगड्या फेकण्याचा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.


या गोंधळानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. AIMIM च्या नगरसेवकांनी काँग्रेसकडून धमक्या दिल्याचा आरोप करत बांगड्या फेकण्याच्या प्रकाराचा निषेध केला आहे.


अपक्ष आशिष पावितत्रकार यांची भूमिका महत्वाची 


भाजपची सत्ता येण्यासाठी ऐनवेळी अपक्ष उमेदवार आशिष पावित्रकर यांनी घेतलेली भूमिका महत्वाची ठरली. आशिष पावित्रकार यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. आणि भरघोस मतांनी निवडून आले. महापौर निवडीसाठी त्यांनी भाजपला साथ दिली.




टिप्पण्या