kidnapping-case-mumbra-akl: मुंब्रा पोलिसांची थरारक कामगिरी:तीन महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण उघडकीस; अकोल्यात छापा, बाळ सुखरूप, आरोपी पती पत्नीस अटक
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मुंब्रा (ठाणे) परिसरात तीन महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपींना अकोला जिल्ह्यातून तात्काळ ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणण्यात मुंब्रा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तब्बल १६०० सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी सहा दिवस अहोरात्र मेहनत घेत ही कारवाई केली. पोलीस तपासात अपहृत बाळ अकोला जिल्ह्यातील खेटरी (ता. पातूर) येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने बाळास सुखरूप ताब्यात घेवून, अकोला पोलिसांच्या मदतीने आरोपी पती पत्नीस अटक करण्यात आली.
घटनेचा तपशील
दि. २२ जानेवारी २०२६ रोजी मुंब्रा येथे सायंकाळी सुमारे ६ वाजता, फिर्यादी फरजाना मोहम्मद फिरोज मन्सुरी (वय २३) ही आपल्या दोन मुलींना कडेवर घेवून डीसीबी बँकेसमोरील रस्ता क्रॉस करत असताना, त्यांची मोठी मुलगी रडत असल्याचे पाहून एका अनोळखी बुरखाधारी महिलेने “मी देखील समोरच चालली आहे, तुमची मुलगी माझ्याकडे द्या”, असे बोलून विश्वासात घेऊन तीन महिन्यांच्या चिमुकलीला जवळ घेवून क्षणात तेथून पळ काढला.
पोलिसांचा थरारक तपास
गुन्हा दाखल होताच ४ विशेष तपास पथके तयार करण्यात आले. मुंब्रा ते सीएसएमटी आणि मुंब्रा ते वांगणी मार्गावरील १६०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले.
आरोपींनी चिमुकलीला लपटलेला कपडा व स्वतःचा नकाब बदलून तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अखेर नसरीन इकलाख शेख (इन्शा नगर मुंब्रा ) या महिलेला ताब्यात घेतल्याने, तपासात अपहृत बाळ अकोला जिल्ह्यातील खेटरी (ता. पातूर) येथे असल्याचे निष्पन्न झाले.
अकोल्यात छापा; बाळ सुखरूप
यानंतर पोलिसांनी तात्काळ अकोला जिल्ह्यात धाव घेत आरोपी मोहम्मद मुजीब गुलाब (वय ३१) व त्याची पत्नी आरोपी खैरुनिसा मुजीब मोहम्मद (वय ३०) यांना हाजी नगर, खेटरी (तालुका पातूर) येथून अटक केली. तर अपहृत चिमुकली आफिया हिला सुखरूपपणे ताब्यात घेण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही उल्लेखनीय कामगिरी
पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे,
सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण,
अपर आयुक्त विनायक देशमुख,
पोलीस उपआयुक्त सुभाषचंद्र बुरसे,
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मुंब्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा गंभीर गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाखरे करीत आहेत.
दरम्यान, हे प्रकरण अवैध दत्तक किंवा बाल तस्करी असल्याचे वरवर दिसून येते. मात्र तीनही आरोपींच्या सखोल चौकशीनंतर या प्रकरणातील सत्यता समोर येईल. दरम्यान पालकांनी अनोळखी लोकांवर विश्वास न ठेवता आपल्या पाल्यांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन अकोला व ठाणे पोलिसांनी केले आहे.
ठळक मुद्दे (News Highlights)
तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण
१६०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
६ दिवस, दररोज १६–१८ तास तपास
अकोला जिल्ह्यातून आरोपी अटकेत
बाळ सुखरूप, कुटुंबाला दिलासा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा