hidayat-patel-attack-case-: अकोल्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ, आरोपी ताब्यात!

अकोट तालुक्यातील मोहाळा गावात मंगळवारी धारदार शस्त्राने हल्ला; हिदायत पटेल गंभीर जखमी




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला | नीलिमा शिंगणे जगड 

अकोल्यात मंगळवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ व वजनदार नेते हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील मोहाळा गावात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



प्राथमिक माहितीनुसार, गावातील राजकीय संघर्षातून मतीन पटेल गटाने हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 


हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत हिदायत पटेल यांना प्रथम अकोटमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोल्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.


राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांचे वातावरण तापलेले असताना अशा प्रकारचा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 


हिदायत पटेल हे अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.


हल्ल्याची माहिती मिळताच अकोला व अकोटमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. परिस्थिती चिघळू नये, यासाठी अकोला शहरासह मोहाळा गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच अटकेची कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. हा हल्ला राजकीय वादातूनच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.



बातमी मधील ठळक मुद्दे

▪️ काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला


▪️ अकोट तालुक्यातील मोहाळा गावात धारदार शस्त्राने वार


▪️ गंभीर जखमी अवस्थेत अकोल्यातील रुग्णालयात उपचार सुरू


▪️ राजकीय संघर्षातून हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय


▪️ महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घटनेचे महत्त्व


▪️ आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना, लवकरच अटक शक्य




आरोपी ताब्यात!

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पणज येथुन‌ एलसीबी अकोला   पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.




टिप्पण्या