akola-crime--instagram-reel- : रिल्स बनविण्याचा नादच खुळा; रिल शूट करताना मैत्रीणने साधला डाव, घरफोडीच्या गुन्ह्यात एका युवतीसह तीन युवक गजाआड



ठळक मुद्दा

घरफोडीचा गुन्हा उघकीस आणुन जुने शहर पोलिसांनी जप्त केला तब्बल २१ लाख ५० हजाराचा मुद्देमाल



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सोशल मीडियावर रील बनवून रातोरात स्टार होण्याचे आणि त्यातून झटपट पैसे कमावण्याचे स्वप्न अनेक जण बघत असतात. यातूनच अलीकडे गंभीर गुन्हे घडत असल्याचे उघडकीस येत आहे. अशीच एक घटना जूने शहर अकोला परिसरातून समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी एका सोशल मीडिया ईन्फ्ल्यून्सर युवतीसह तीन युवकांना गजाआड केले आहे. या चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.


या घटनेतील फिर्यादी महिलेची शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी ओळख झाली होती. हळूहळू दोघींमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. आरोपी महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादन करून दोघी मिळून इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म साठी रील्स तयार करू लागल्या. घटनेच्या दिवशी देखील रील बनवण्याच्या बहाण्याने आरोपी महिलेनी फिर्यादी महिलेला आपल्या घरी बोलाविले, आणि रील शूट करताना तिने फिर्यादीचे लक्ष विचलित केले. संधी साधत फिर्यादीच्या घरात घुसून अलमारीतून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे 20 लाखांचा ऐवज चोरून घरफोडी सारखा गंभीर गुन्हा केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आरोपी महिलेसह तिघांना पोलीसांनी अटक केली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, जुने शहर पोलिसांनी आरोपींकडून तब्बल २१ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.





पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलीस स्टेशन जुने शहर अकोला हद्‌दीतील सागर कॉलनी, वाशिम बायपास, अकोला येथे राहणारे नेहा राजेश सावदेकर (वय ३० वर्ष रा. वाशिम बायपास रोड, अकोला) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीवरून कलम ३०५, ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. 


जूने शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नेहा सावदेकर ह्या १२ फेब्रुवारी २०२६ चे दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घरासमोरील गवई यांचे घरी कामानिमीत्त गेल्या असतांना कोणी तरी अज्ञात इसमांनी त्यांच्या राहते घरामधुन सोन्याचा नेकलेस वजन ५२ ग्रॅम, सोन्याचे २ मोठे नेकलेस वजन ४० ग्रॅम, सोन्याचे चेन व लॉकेट १२ ग्रॅम,  सोन्याचे ३ अंगठ्या वजन १५ ग्रॅम,  सोन्याचे २ पोत वजन २० ग्रॅम, ब्रेसलेट (मनीगडु) ३ ग्रॅम,  लहान नेकलेस वजन १८ ग्रॅम रोख रक्कम ९०,०००/-रू असा मुद्देमाल चोरी केला. फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपासात घेतला.


गुन्हयाचे प्राथमिक तपासात कोणताही तांत्रिक पुरावा मिळुन न आल्याने, गुन्हयातील संशयीत आरोपी यांनी पोलीसांना उडवाउडवीचे उत्तरे देवुन तपास दुसरी कडे ओढवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी संशयीतांचे हालचालीचा बारकाईने मागोवा घेतला. सदर चोरी ही समिक्षा अनिल गवई हीने करून, तीचा जुना प्रियकर ऋतीक अजाबराव श्रृंगारे (वय २२ वर्ष रा. हीरपुर, ता. मुर्तीजापुर जि. अकोला) याला अकोला बोलवीले असता, ऋतीक अजाबराव श्रृंगारे हा त्याचा मित्र समीर प्रदीप तेलखडे (वय १९ वर्ष रा. आरटीओ रोड बचत भवन, कलेक्टर ऑफीस, अमरावती) याचे सोबत १२ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी सहा वाजताचे दरम्यान अकोला येथे आले. तेव्हा समिक्षा गवई व तिचा अन्य साथिदार वैभव संजय गोपनारायण (वय २३ वर्ष रा. कमला नगर, वाशिम बायपास अकोला) याचे सह चिवचिव बाजार या परीसरात जावुन चोरी केलेला मुद्देमाल लपविण्याकरीता मित्रांच्या सुपुर्द केला असल्याचे गोपनीय माहीती पोलीसांना प्राप्त झाल्याने, त्या दोन संशयित आरोपींतांचा पाठलाग करून अमरावती येथुन तपास पथकाने मोठे कौशल्य वापरून सापळा रचुन ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सदर गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता, आरोपीतांनी गुन्हामध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. यावरून  आरोपीचे ताब्यातुन चोरीस गेलेले सर्व दागीने ज्यांचे वजन अंदाजे १३८ ग्रॅम ज्याचे चालु बाजार भावाप्रमाणे एकुण किंमत अंदाजे २१ लाख रूपये व गुन्हयात वापरलेले मोटसायकल अंदाजे किंमत  ५०,०००/-रू असा एकुण २१,५०,०००/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


सदर चोरी ही आरोपी समिक्षा हीने केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, गुन्हयातील आरोपी समिक्षा (वय १९ वर्ष रा.  वाशिम बायपास, अकोला) व तिचे अन्य साथीदार वैभव संजय गोपनारायण (वय २३ वर्ष रा. कमला नगर, वाशिम बायपास अकोला), ऋतीक अजाबराव श्रृंगारे (वय २२ वर्ष रा. हीरपुर, ता. मुर्तीजापुर जि. अकोला), समीर प्रदीप तेलखडे (वय १९ वर्ष रा. आरटीओ रोड बचत भवन, कलेक्टर ऑफीस, अमरावती) यांना अटक करण्यात आली आहे.


सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन जुने शहर अकोलाचे पोलीस निरिक्षक नितीन लेव्हरकर, तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक रविंद्र करणकार, पोलीस अमलदार पंकज उपाध्याय, सागर शिरसाट, पवन डांबलकर, आशिष नांदोकार, श्रीकांत पवार, शेख असलम, गोपाल ठाकुर, महिला पोलीस अंमलदार निशा वाकडे, धनश्री सांगेवार यांनी केली.


टिप्पण्या