amc-election-bjp-political-news : कार्यकर्ता हाच भाजपाचा आत्मा; अकोला महापालिकेत महापौर भाजपाचाच – नामदार चंद्रशेखर बावनकुळे



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला | भारतीय जनता पक्षाचा खरा आधारस्तंभ म्हणजे कार्यकर्ता असून तोच पक्षाचा हनुमान व आत्मा आहे, असे ठाम प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपा निवडणूक प्रभारी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 


अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित भाजपा उमेदवार व संचलन समितीच्या नियोजन बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.


अकोला महापालिकेत मोठ्या प्रमाणात इच्छुक असतानाही केवळ काही मोजक्या लोकांनी पक्षांतर केले. मात्र, बहुसंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश मानून आपले नामांकन पत्र मागे घेतले. हीच भारतीय जनता पक्षाची खरी ताकद असून हीच कार्यकर्त्यांची जादू आहे, असे बावनकुळे म्हणाले. 



कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या आणि मतदारांच्या आशीर्वादाच्या बळावर भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस युती अकोला महापालिकेत महापौर पदावर विराजमान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


या बैठकीस मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस व अकोला महानगरपालिका निवडणूक प्रभारी आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोटेकर, जयंत मसने व विजय अग्रवाल उपस्थित होते.



तीन पिढ्यांच्या संघर्षातून, कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्ष, विचार आणि राष्ट्रासाठी समर्पित राहिलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडलेल्या कार्यकर्त्यांना नामदार बावनकुळे यांनी शतशत नमन केले. स्वार्थापेक्षा राष्ट्र आणि पक्ष प्रथम मानणाऱ्या या कार्यकर्त्यांमुळेच भाजपा आज मजबूत आहे, असे त्यांनी सांगितले.


यावेळी खासदार अनुप धोत्रे म्हणाले की, तब्बल १,२०० हून अधिक इच्छुक असतानाही पक्षाने ६२ जागांवर उमेदवार दिले. युतीत काही जागा गेल्या तरी कार्यकर्ते निराश न होता पक्षाच्या पाठीशी ठाम उभे राहिले. केवळ स्वार्थी लोकांनी पक्षांतर केले, मात्र नाराजी व्यक्त करूनही अनेक कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, संघाच्या संस्कारातून घडलेले कार्यकर्ते अकोल्याच्या विकासासाठी एकनिष्ठेने काम करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.


प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले की, पक्षाने बूथ प्रमुखांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांना संधी दिली आहे. सामाजिक दायित्व, सर्वेक्षण आणि संघटनाच्या बळावर उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने सर्व काही दिल्यानंतरही कोणी नाराज असेल तर त्यांनी आत्मचिंतन करावे. नाराज होणे हा अधिकार असला, तरी पक्ष विस्तार करणे हे कर्तव्य आहे. अकोला महापालिकेत भाजपाचा झेंडा फडकवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



यावेळी संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोटेकर यांनी उमेदवार व विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणूक कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विजय अग्रवाल व जयंत मसने यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.


टिप्पण्या