ठळक मुद्दा
महापालिका निवडणूक प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचे घणाघाती वक्तव्य; अकोला शहरासाठी विकासाची मोठी आश्वासने
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला | नीलिमा शिंगणे जगड
जे स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार समजतात, ते कार्यकर्त्यांसाठी फिरकत नाहीत. त्यांचा जीव मुंबईच्या तिजोरीत अडकलेला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले, त्यामुळे कार्यकर्त्यांनीच त्यांना घरी बसवले, अशा तीव्र शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
महापालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
“मी कार्यकर्ता म्हणून काम करणारा आहे. काही लोक स्वतःला मालक समजतात, त्यामुळेच पक्ष मोठा होत नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी शिवसेना आहे,” असे शिंदे म्हणाले.
यावेळी त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’ संदर्भात स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की,
“लाडक्या बहिणींनी मला ‘लाडका भाऊ’ ही नवी ओळख दिली आहे. कोणी माईकलाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.”
अकोला शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगत, महापालिका निवडणुकीत विजय मिळाल्यास शहरासाठी विविध विकासकामे करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आपल्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना शिंदे म्हणाले,
“मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा चेला आहे. दिलेला शब्द मी पाळतो. एकदा कमिटमेंट केली की त्यावर माघार नाही. 2022 मध्ये आपण हे पाहिले आहे.”
“मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन करतो. शिवसेना वाचवण्याचे काम मी केले आहे,” असे सांगत अकोल्यात ठासून विजय मिळवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सभेला केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री संजय राठोड, माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, माजी आमदार नारायण गव्हाणकर, आमदार विप्लव बाजोरिया, श्रीकांत देशपांडे, उषा विर्के, श्रीरंग पिंजरकर, योगेश अग्रवाल, अश्विन नवले, राजेश मिश्रा, विठ्ठल सरप, संतोष अनासने, चंद्रकांत पांडे , डॉ दीपक केळकर आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठळक मुद्दे
एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर थेट हल्ला
“कार्यकर्त्यांनीच मालकांना घरी बसवले” असे वक्तव्य
‘लाडकी बहीण योजना’ कधीही बंद होणार नाही – शिंदे
अकोला शहरासाठी विकासकामांची मोठी घोषणा
महापालिका निवडणुकीत ठासून विजयाचा निर्धार
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पदभरतीचे आश्वासन
प्रत्येक प्रभागात बाळासाहेब ठाकरे उद्यानाची योजना
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा