चित्रा चौकातील कमला रेस्टॉरंटचे संचालक व माजी महापौर मदन भरगड यांचे थोरले बंधू कमलकिशोर भरगड काळाच्या पडद्याआड
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील खोलेश्वर परिसरातील प्रतिष्ठित भरगड कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि जुन्या अकोल्यात ‘धर्मेंद्र’ म्हणून ओळखले जाणारे कमलकिशोर बोदुलाल भरगड (वय 75) यांचे 9 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
कमलकिशोर भरगड हे चित्रा चौकातील प्रसिद्ध कमला रेस्टॉरंटचे संचालक होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेला देखणा अंदाज, बोलण्याची शैली आणि वागणूक यामुळे त्यांना परिसरात ‘अकोल्याचे धर्मेंद्र’ अशी खास ओळख मिळाली होती. मुंबईवरून ते जेव्हा अकोल्यात येत असत, तेव्हा कमला रेस्टॉरंटवर त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची अक्षरशः रांग लागत असे. त्यांनी ‘गरिबी हटाव’ या हिंदी चित्रपटात इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. जी त्यांच्या चाहत्यांच्या आजही स्मरणात आहे. अकोल्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक परंपरेत त्यांनी मोठे योगदान दिले.
कमलकिशोर बोदुलाल भरगड हे माजी महापौर मदन भरगड यांचे ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, एक मुलगा, दोन भाऊ, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंतिम यात्रा उद्या बुधवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता खोलेश्वर येथील निवासस्थानापासून निघून, मोहता मिल रोडवरील तोष्णीवाल मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
त्यांच्या निधनाने अकोल्यातील जुन्या आठवणींना स्पर्श केला असून, राजकीय, व्यापारी, समाजसेवी आणि नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. भारतीय अलंकार न्यूज 24 तर्फे कमलकिशोर भरगड यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा