akola-municipal-election-amc: अकोला महापालिका निवडणुकीआधी भाजपसमोर अंतर्गत बंडाचे मोठे आव्हान; ‘नागरिक संवाद मंच’मुळे राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले असतानाच, भारतीय जनता पक्षासमोर (भाजप) अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचे गंभीर आव्हान उभे ठाकल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. भाजपमधून निष्कासित झालेले आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘नागरिक संवाद मंचा’मुळे अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीतील नाराजीचा भाजपला फटका !
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते व तब्बल ३० वर्षे नगरसेवक राहिलेले हरीश अलीमचंदानी यांनी पक्षाला रामराम ठोकत निवडणूक लढवली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने त्यांना साथ दिली.
त्याचप्रमाणे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक ओळंबे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून भाजपविरोधात निवडणूक लढवली.
या दोन्ही बंडखोर उमेदवारांमुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले आणि त्याचा थेट फटका भाजपला बसला. अखेर भाजपला या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला.
शिस्तभंग कारवाईनंतर ‘नागरिक संवाद मंच’ची स्थापना
पराभवानंतर भाजपने पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत अनेक आजी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.
आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप या निष्कासित कार्यकर्त्यांचा पुनर्विचार करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर नाराज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘नागरिक संवाद मंच’ची स्थापना केली आहे.
नागरिक संवादातून थेट भाजपला आव्हान
या मंचाच्या माध्यमातून आयोजित संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली.
या कार्यक्रमात
आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवक कसा असावा?
नागरिकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत?
अकोला शहराच्या विकासासाठी कोणते मुद्दे प्राधान्याचे आहेत?
यावर नागरिकांनी मोकळेपणाने आपली मते मांडली.
या संवादातून अप्रत्यक्षपणे भाजपला थेट आव्हान देण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपविरोधात ‘विकास आघाडी’च्या नावाने एकत्रित मोर्चेबांधणी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
‘नाराजांची एक मूठ’ भाजपची डोकेदुखी वाढवणार?
जर हे सर्व नाराज नेते आणि कार्यकर्ते प्रत्यक्षात एकत्र आले, तर भाजपची डोकेदुखी निश्चितच वाढणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
विशेषतः हरीश अलीमचंदानी यांच्या नेतृत्वाखाली आघाडी उभारावी, अशी मागणी संवाद मंचात उपस्थित आयोजकांसह अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
काय म्हणतात अशोक ओळंबे
“विधानसभा निवडणुकआधी या मतदारसंघासाठी भाजपतील अनेक इच्छुक दिग्गजांनी बरेच वर्षे मेहनत घेतली होती. मात्र शेवटी विजय अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे इच्छुकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आता आम्ही एकत्र आलो आहोत.”
महापालिका निवडणुकीत बदलते राजकीय संकेत
माजी नगराध्यक्ष असलेले हरिश आलिमचंदानी हे प्रामाणिक कार्यकर्ते आहे आणि स्वच्छ चारित्र्यामुळे जनमानसात त्यांचा तितकाच प्रभाव आहे. भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप त्यांच्यावर नाही. सिंधी समाजाबरोबर इतर ही समाजात त्यांच्या शब्दाला मान आहे. त्यामुळे हरिश आलिमचंदानी हे महापालिका निवडणुकीत प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व नक्की आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हरीश अलीमचंदानी यांनी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही कडवी झुंज देत नागरिकांची मने जिंकली होती.
आता अकोल्यात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नागरिक मंच द्वारा उभारलेले हे नवे राजकीय समीकरण अकोल्याच्या राजकारणाला नवी दिशा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्दे (News Highlights)
अकोला महापालिका निवडणुकीआधी भाजपसमोर अंतर्गत बंडाचे आव्हान
निष्कासित नगरसेवकांची ‘नागरिक संवाद मंच’द्वारे एकजूट
भाजपविरोधात ‘विकास आघाडी’ स्थापन होण्याची शक्यता
हरीश अलीमचंदानी यांच्या नेतृत्वाची नागरिकांकडून मागणी
महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत
News Points
Akola Politics, Akola Municipal Election, BJP Internal Crisis,
Nagrik Samvad Manch, Harish Alimchandani, Ashok Olambe,
Vikas Aghadi, Akola News, Mahanagar palika Election
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा