BNS2023-akola-crime-news: अकोला जिल्ह्यात पहिली मोठी कारवाई; संघटित गुन्हेगारी कलम १११ अंतर्गत ११ सराईत गुन्हेगारांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल



ठळक मुद्दे

खदान पोलीस ठाण्याची मोठी कामगिरी 


एसपी अर्चित चांडक यांनी दिला कठोर कारवाईचा इशारा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला जिल्ह्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या संघटित गुन्हेगारी कलम १११ अंतर्गत कारवाई करत जिल्ह्यातील पहिली मोठी कार्यवाही करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला येथे दोषारोपपत्र दाखल केले आहे.





फिर्यादीवर हल्ला व लुटमारीचा प्रकार


दिनांक १७ जुलै २०२५ रोजी फिर्यादी पंकज माधवराव धांडे (वय ३४, रा. लहरिया नगर, अकोला) यांनी खदान पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे, आरोपी सचिन बलखंडे (वय ३०) आणि त्याच्या साथीदारांनी पैशांच्या कारणावरून फिर्यादीस बोलावून घेतले व घरात बंद करून जबर मारहाण करत सोन्याचे दागिने आणि रोकड हिसकावून घेतली.


या प्रकरणात अपराध क्रमांक ५८२/२०२५ अंतर्गत कलम ३११, १२८(क), ११९(२), १२७(२)(७), ३५१(२) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.





११ जणांची गुन्हेगारी टोळी उघड


तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी सचिन मुकुंद बलखंडे (टोळीप्रमुख) आणि त्याच्या १० साथीदारांचा मागील १० वर्षांचा गुन्हेगारी इतिहास तपासला असता, त्यांनी खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमवणे, शस्त्रधारी दंगा, शांतता भंग, आणि पुरावे नष्ट करण्याचे अनेक गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.


या सर्व आरोपींवर आधीच विविध प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले असल्याचेही पोलिसांनी सांगितले.





संघटित गुन्हेगारी कलम १११ अंतर्गत दोषारोपपत्र


संपूर्ण तपास पूर्ण केल्यानंतर खदान पोलिसांनी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी या टोळीविरुद्ध संघटित गुन्हेगारी कलम १११(१)(२)(३)(४) अंतर्गत जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला येथे दोषारोपपत्र दाखल केले.

ही कारवाई अकोला जिल्ह्यातील पहिली कार्यवाही ठरली आहे.





पोलीस अधीक्षक यांचा इशारा  

“गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाई होईल”


पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की, 


“जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मकोका, एमपीडीए किंवा भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. कोणालाही गुन्हेगारीला खतपाणी घालू देणार नाही.”




Keywords Box 


अकोला पोलीस, खदान पोलीस ठाणे, संघटित गुन्हेगारी कलम १११, अर्चित चांडक, भारतीय न्याय संहिता २०२३, गुन्हेगारी टोळी, दोषारोपपत्र, अकोला न्यायालय, BNS 2023, Akola Crime News





टिप्पण्या