raman-chandak-murder-case: व्यापारी रमण चांडक हत्या प्रकरण: आरोपी गजानन रेळे याला दिलासा नाही; जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला




नीलिमा शिंगणे जगड 

अकोट : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात व्यापारी रमण चांडक यांच्या हत्येच्या बहुचर्चित प्रकरणात महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी गजानन साहेबराव रेळे (वय ५४, रा. वडाळी सटवाई, ता. अकोट) याने दाखल केलेला पहिला जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.


दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली. खून प्रकरणातील गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला कोणताही दिलासा न देता कारागृहातच ठेवण्याचा आदेश दिला.


प्रकरणाची पार्श्वभूमी

दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी रात्री व्यापारी रमण चांडक अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी दहीखेड फुटकर शिवारातील एका अर्धवट बांधकामावर चांडक यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

फिर्यादी संदीप किरणकुमार चांडक (पुतण्या) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गजानन रेळे याने आर्थिक व्यवहारातील वादातून चांडक यांना अज्ञातस्थळी नेऊन, स्लॅबवरील दगडावर डोके आपटून खून केला, असा आरोप करण्यात आला.


सरकारी वकिलांचा युक्तीवाद

सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात तीव्र विरोध दर्शवला.

त्यांनी मांडले की :

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपी दोषी ठरल्यास जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते.

साक्षीदारांच्या जबाबांनुसार आरोपीला व मृतकाला एकत्र फिरताना पाहिले आहे.

आरोपीला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो.

पैशाच्या वादामुळे खून झाल्याने मृतकाच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

या सर्व मुद्द्यांचा दाखला देत त्यांनी जमानत अर्ज फेटाळण्याची मागणी केली.


न्यायालयाचा निर्णय

सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गजानन रेळे याचा पहिला जमानत अर्ज फेटाळला. सध्या तो (आरोपी) ८ एप्रिल २०२५ पासून अकोला कारागृहात बंदीस्त आहे.


या प्रकरणात सरकार पक्षाला ॲड. मोतिसिंह मोहता सहकार्य करीत आहेत.


पीडित पक्षासाठी दिलासा देणारा

रमण चांडक यांच्या हत्येच्या या चर्चित प्रकरणात न्यायालयाचा निर्णय हा पीडित पक्षासाठी दिलासा देणारा ठरला आहे. आता या प्रकरणाचा सत्र खटला जलद गतीने चालवला जाणार असल्याचे संकेत सरकार पक्षाने दिले आहेत.


     ………………...............

रमण चांडक खून प्रकरण 

गजानन रेळे जमानत

अकोट सत्र न्यायालय निर्णय

अकोला गुन्हेगारी बातमी

व्यापारी हत्या खटला

       ……………………..



टिप्पण्या