hindu-jan-aakrosh-morcha-akl: अल्पवयीन मुलीवरील अत्याचार;सकल हिंदू समाजाचा एल्गार, जलदगती न्यायालयात खटला चालवा...




नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: येथील डाबकी रोड परिसरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार नंतर संपूर्ण अकोला शहर हादरले आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने अभूतपूर्व एकजूट दाखवत प्रचंड ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढला. श्री राजेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारों नागरिक सहभागी झाले होते. 


दरम्यान, पोलिसांनी देशभरात पाच हजार किलोमीटरचा पाठलाग करून आरोपीला अटक केली आहे. मोर्चात "आरोपीला तात्काळ फाशी झालीच पाहिजे" आणि "जलदगती न्यायालयात खटला चालवा" या मागण्यांनी जोर धरला. या वेळी अहिल्यानगरचे  आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्रात "लव्ह जिहाद विरोधी कायदा" तातडीने लागू करण्याची जोरदार मागणी केली. सकल हिंदू समाजातर्फे जन आक्रोश मोर्चाचे आयोजनची घोषणा केल्यानंतर पोलिसांवर दबाव वाढला व आरोपीला अटक करण्यात आली, असे ते भाषणात म्हणाले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या मार्गावरील दुकानदारांनी आपली दुकाने समर्थनार्थ बंद केली. माता भगिनी आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन मोर्चामध्ये सामील झाल्या.


काय आहे धक्कादायक घटना?


अकोला शहराला काळिमा फासणारी ही संतापजनक घटना ६ सप्टेंबर रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत  घडली. 


आई-वडिल गणेश विसर्जनासाठी बाहेर गेलेले असताना त्या संधीचा लाभ घेत आरोपी तौहिदखान समीरखान बैद (वय २८) याने पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात जबरदस्तीने घुसून चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यावर जबरी अत्याचार केला. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण अकोला शहरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी शहरातील वातावरण संवेदशील झाले होते. 


हिंदूंनी जनआक्रोश मोर्चा काढण्याचे ठरवल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ४० जणांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने आरोपीला मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली. 


जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, समाजाच्या ठाम मागण्या


हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या समारोपात जिल्हाधिकाऱ्यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले. यात प्रशासनापुढे काही महत्त्वपूर्ण मागण्या ठेवण्यात आल्या.


१. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून खटला जलदगती न्यायालयात (Fast Track Court) चालवावा.

२. नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी.

३. आरोपीचे घर बुलडोजरने उद्ध्वस्त करण्यात यावे. जेणेकरून अशा लोकांवर जरब बसेल.

४. अशा नराधम आरोपीला कोणत्याही समाज किंवा धर्मगुरूने पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल करावेत. 

५. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत, पोलीस संरक्षण आणि पूर्ण कायदेशीर सहाय्य पुरवावे.

६. उत्तर प्रदेश व राजस्थान या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जन्मठेपेची शिक्षा देणारा कठोरतम असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ त्वरित लागू करावा. त्याचा अध्यादेश काढावा.


"मागण्या मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नाही"


या घटनेमुळे अकोला शहर आणि संपूर्ण हिंदू समाज अत्यंत अस्वस्थ, भयग्रस्त आणि संतप्त आहेत. या घटनेची गंभीर दखल घेऊन वरील मागण्यांची त्वरित पूर्तता करावी. जर आरोपीवर तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर समाजात मोठा असंतोष निर्माण होईल; प्रशासनाची प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आम्ही पुन्हा स्पष्ट करू इच्छितो की, आमच्या बहिणी-मुलींची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि पीडितेला न्याय मिळेपर्यंत संपूर्ण हिंदू समाज शांत बसणार नाही. आजचा मोर्चा ही तर सुरूवात आहे. यानंतर 'अकोला शहरात तीव्र आंदोलने केली जातील, त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन व जिल्हा प्रशासनाची राहील", असा ठाम निर्धार या मोर्चातून व्यक्त करण्यात आला.

टिप्पण्या