heavy-rains-ganesh-visarjan-: गणपती विसर्जन वेळी दमदार पावसाची हजेरी... पुढच्या वर्षी लवकर या…बाप्पांना भक्तांची आर्त विनवणी
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: दहा दिवसांसाठी मुक्कामाला आलेल्या गणपति बाप्पांना शनिवारी घरोघरी अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. तर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी शिस्तबध्दरित्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होवून बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या,अशी आर्त विनविणी केली. राजराजेश्वर नगरीतील पहिला मानाच्या बाराभाई गणपतीचे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गणेश घाटावर आगमन झाले. महाआरती करुन बाप्पांना निरोप देण्यात आला. दरम्यान परंपरे नुसार श्री बाराभाई गणेश मूर्तीचे विसर्जन न करता छोट्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यानंतर दुसरा मानाचा गणपति श्री राज राजेश्वर गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणुकीत तरुणाईचा उत्साह दिसून येत होता. तर काही भाविकांचे मन बाप्पांना निरोप देताना गहिवरुन आले होते. अनेकांनी मातीच्या गणेश मुर्तीचे घरीच विसर्जन केले. तर सार्वजनिक ठिकाणी महापालिका, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, राजकिय पक्ष यांनी कृत्रिम विसर्जन कुंड स्थापित करत गणेश मुर्ती विसर्जनाची सोय केली होती. टाळ मृदुंग, दिंडी, झाँझ, ढोल पथक, लेझिम पथक यामुळे मिरवणूकीला पारंपरिकतेचा साज चढला होता. या उत्साहात मात्र गणपती बाप्पाला निरोप देताना कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
शहरात व मिरवणुक मार्गावर ठीकठिकाणी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. मिरवणुक मार्गात प्रसाद, जल वितरण करण्यात आले. दरम्यान दुपारी पावसाने हजेरी लावल्याने गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. मात्र भर पावसातही काहींनी नाचण्याचा आनंद लुटला. सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावल्याने मिरवणूक बघण्याकरिता घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर गणेश मंडळांनी आपापल्या मंडळाच्या मिरवणुकी आटोपत्या घेतल्या.
अकोला शहराला गणेशोत्सवाची शतकोत्तर वर्षांची परंपरा लाभलेली असून गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह भक्तांमध्ये ओसंडून वाहत होता. अकोल्यातील पहिला मानाचा गणपती बाराभाई गणपतीचे पूजन सकाळी ११ वाजताच्या सुमारास जयहिंद चौक येथे पालकमंत्री ॲड आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत यावेळी आरती करण्यात आली.
यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. दगडी पूल, अलका बॅटरी, दीपक चौक, कच्छी मशिद, ताजनापेठ, गांधी रोड, सिटी कोतवाली मार्गे गणेश विसर्जन मिरवणुक गणेश घाट येथे पोहचली.
शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.
विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ जयहिंद चौक, अगरवेस मार्ग हनुमान चौक, दगडीपुल, नागपूरी जीन चौक, मामा बेकरी, शहीद अब्दुल हमीद चौक, कच्छी मस्जीद चौक, ताजनापेठ, गांधी चौक गांधी मार्ग येथून सिटी कोतवाली चौकातून गणेश घाटावर मिरवणूक पोहचली. अनेक मोठया गणपति मंडळांनी प्रतीकात्मक छोट्या गणपति मूर्तीचे येथे विसर्जन करुन आपल्या सोयीच्या ठिकाणी भव्य गणेश मूर्ती विसर्जित केल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा