anti-corruption-bureau-akl-bul: बुलढाणा अँटी करप्शनची मोठी कारवाई ; तलाठी एक लाखाची लाच घेताना रंगेहात अटक
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तलाठी सतीश सुभाष कराड (वय ३६ वर्षे) यांना १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना बुलढाणा अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले. ही कारवाई २९ सप्टेंबर २०२५ रोजी श्रीकृपा पेट्रोल पंपासमोर, शेगाव-अकोट रोड, निंबा फाटा येथे करण्यात आली.
शेती गट नंबर दुरुस्ती साठी मागितली लाच
तक्रारदाराने २०२४ साली कारजा रमजानपूर शिवारामध्ये शेती खरेदी केली होती. त्या शेतीचा गट क्रमांक दुरुस्ती करण्यासाठी तलाठी सतीश कराड यांनी १,२५,००० रुपयांची लाच मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम १ लाखांवर निश्चित करण्यात आली.
पडताळणी आणि सापळा यशस्वी
२३ सप्टेंबर २०२५ रोजी तक्रारदाराने अकोला अँटी करप्शनकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २४ सप्टेंबरला पडताळणी दरम्यान तलाठीने लाच मागणीची खात्री पटली. त्यावरून २९ सप्टेंबर रोजी सापळा रचला असता, तलाठी कराड यांनी पंचासमक्ष १ लाख रुपये स्वीकारले आणि त्याच क्षणी अँटी करप्शनने त्यांना ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल व पुढील कारवाई
तलाठी कराड यांच्याविरुद्ध उरळ पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
पथकातील अधिकारी व कर्मचारी
या सापळा कारवाईत मारुती जगताप (पोलिस अधीक्षक, अँटी करप्शन अमरावती), सचिंद्र शिंदे (अप्पर पोलिस अधीक्षक, अमरावती), मिलींदकुमार बहाकर (उपअधीक्षक, अकोला घटक) व भागोजी चोरमले (उपअधीक्षक, बुलढाणा घटक) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई यशस्वी केली. यामध्ये प्रविण वैरागी, अमोल झिने, दिपक जाधव, जगदीश पवार, रंजित व्यवहारे, नितीन शेटे, संदीप ताले आदींचा सहभाग होता.
नागरिकांना आवाहन
"शासकीय सेवकाने लाच मागितल्यास नागरिकांनी त्वरित अँटी करप्शन ब्युरो, बुलढाणा कार्यालय (टोल फ्री क्रमांक १०६४) किंवा अकोला कार्यालयाशी संपर्क साधावा," असे आवाहन पोलिस निरीक्षक विलास गुसिंगे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा