akola-dharmaantar-34-arrested :अकोल्यात धर्मांतराचा प्रयत्न; 34 जणांविरोधात गुन्हा दाखल


 


ठळक मुद्दा

पैशांचे आमिष दाखवून धर्मांतरणाचा प्रयत्न; चान्नी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल





नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील अंधारसावंगी गावात धर्मांतराचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. एका अपंग आदिवासी व्यक्तीला पैशांचे आणि रोगमुक्तीचे आमिष दाखवून धर्म बदलण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तब्बल ३४ जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.




धर्मांतराचा आरोप

पातूर तालुक्यातील अंधारसावंगी गावातील रहिवासी देवानंद चवरे (अपंग आणि दमाग्रस्त) यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. गावातील सोनाजी शिंदे यांनी त्यांना प्रार्थना सभेमध्ये सामील होण्यास सांगितले.


आमिष आणि आश्वासन

तक्रारीनुसार, देवानंद चवरे यांना धर्म बदलल्यास दम्याचा आजार बरा होईल आणि ५० हजार ते १ लाख रुपये मिळतील, असे आश्वासन देण्यात आले.


ग्रामस्थांची सतर्कता


ही माहिती देवानंद चवरे यांनी गावकऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ सोनाजी शिंदे यांच्या घरी धाव घेतली. तिथे ३५ ते ४० अनोळखी पुरुष आणि महिला मेणबत्त्या लावून प्रार्थना करताना आढळले.


पोलिसांची कारवाई


घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले.


गंभीर आरोप


उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूरचे गजानन पडघन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आरोपींचे स्पष्टीकरण

काही महिला आरोपींनी आपण फक्त नातेवाईकाकडे प्रार्थनेसाठी आलो होतो आणि कोणावरही धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.



हा प्रकार अत्यंत संवेदनशील असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.




टिप्पण्या