akola-consumer-forum-result: वाहन चोरी गेल्यावर विमा दावा नाकारला; इन्शुरन्स कंपनीला ग्राहक मंचाने दिला दणका



नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: वाहन चोरीला गेल्यावर विमा दावा नाकारणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. तक्रारदार सुरेशचंद्र दीक्षित यांना रुपये २८,००० ची मूळ रक्कम आणि त्यासोबत शारीरिक व मानसिक त्रासासाठी  रुपये ८,००० अशी एकूण रुपये ३६,००० देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.


अकोल्यातील रहिवासी सुरेशचंद्र दीक्षित यांनी आपली Honda Activa (क्र. MH ३० AK-३९९७) गाडीसाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीकडून विमा पॉलिसी घेतली होती. या पॉलिसीचा कालावधी १३ डिसेंबर २०२३ ते १२ डिसेंबर २०२४ पर्यंत वैध होता. मात्र, ७ मार्च २०२४ रोजी दीक्षित यांच्या घराच्या आवारातून त्यांची गाडी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेली.


विमा कंपनीची टाळाटाळ


गाडी चोरीला गेल्यानंतर दीक्षित यांनी तात्काळ संबंधित कंपनीकडे विमा दाव्यासाठी अर्ज केला. परंतु, कंपनीने त्यांचा दावा नाकारला आणि त्यांना रक्कम देण्यास नकार दिला. यामुळे दीक्षित यांनी ॲड. मो. इल्यास शेखानी यांच्यामार्फत कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली. या नोटीसची दखल न घेतल्याने अखेरीस त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली.


ग्राहक मंचाचा महत्त्वपूर्ण निर्णय


जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे ऐकून घेतले. यावेळी, ॲड. शेखानी यांनी दीक्षित यांच्या बाजूने भक्कम पुरावे सादर करत युक्तिवाद केला. आयोगाने ICICI लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीला दोषी ठरवत त्यांना आदेश दिले की, त्यांनी दीक्षित यांना ₹२८,००० ची मूळ रक्कम तसेच तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून प्रत्यक्षात रक्कम मिळेपर्यंत ६ टक्के दराने व्याज द्यावे.

याशिवाय, शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रू. ८,००० आणि तक्रारीचा खर्चही देण्याचे आदेश दिले आहेत. ही सर्व रक्कम ४५ दिवसांच्या आत देण्याचे निर्देश आयोगाने कंपनीला दिले आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारावर अंकुश बसण्यास मदत झाली आहे.


ठळक मुद्दे


Honda Activa ची चोरी 


सुरेशचंद्र दीक्षित यांची Honda Activa गाडी त्यांच्या घराच्या आवारातून चोरीला गेली होती.


ग्राहक मंचाकडे धाव

कंपनीने दावा नाकारल्या नंतर ॲड. मो. इलयास शेखानी यांच्यामार्फत दीक्षित यांनी जिल्हा ग्राहक निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली.


कंपनीला दोषी ठरवले

सुनावणीनंतर आयोगाने ICICI लोम्बार्ड कंपनीला दोषी ठरवून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.


भरपाई आणि दंड

कंपनीला रुपये २८,००० मूळ रक्कम, त्यावर ६% व्याज आणि रुपये ८,००० दंड असे एकूण रुपये ३६,००० देण्याचे आदेश.


टिप्पण्या