akola-city-latest-crime-news-: अकोल्यात संतापजनक घटना : सावत्र बापाकडून निरागस चिमुकलीवर अत्याचार; शहर हादरलं



नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरात पुन्हा एकदा मानवी नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावत्र बापाने केवळ पाच वर्षांच्या निरागस चिमुकलीवर अत्याचार केला. या घटनेनंतर संपूर्ण शहरात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित मुलीची आई गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास सावत्र वडिलांनी निर्दयी कृत्य करत बालिकेवर अत्याचार केला. त्यानंतर मुलीला तीव्र वेदना जाणवू लागल्याने आई घरी परतल्यावर तिने रडत घडलेला प्रकार सांगितला. तत्काळ बालिकेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणेदार मनोज केदारे यांनी दिली आहे.


या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून समाजसेवी संस्था आणि नागरिकांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर समाजात गुन्हेगारीला आळा बसावा, अशी मागणी होत आहे.


या निर्दोष निरागस चिमुकलीला न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि पुन्हा अशा घटना घडू नयेत, अशीच अपेक्षा संपूर्ण अकोल्याची आहे.



टिप्पण्या