vidarbha-rain-weather-alert-: विदर्भ हवामान इशारा : अमरावती-नागपूरमध्ये जोरदार सरींची शक्यता; अकोला मध्ये विजेचा गडगडाटासह पाऊस !





📌 ठळक मुद्दे :

अमरावती व नागपूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता


अकोला, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीत वीज व गडगडाटासह पाऊस


वर्धा, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस

नागरिकांना सावधगिरीचा सल्ला




नीलिमा शिंगणे जगड 

अकोला  : प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरने विदर्भासाठी तात्काळ हवामान इशारा दिला आहे. आज 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील काही तास हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे.



हवामान विभागाच्या माहितीनुसार, अमरावती व नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज व गडगडाटासह जोरदार सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, अकोला, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. तसेच, वर्धा, यवतमाळ, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.



दरम्यान, नागरिकांनी विजेच्या कडकडाटाच्या काळात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. विजेच्या गडगडाटात मोकळ्या मैदानात न थांबणे, झाडाखाली उभे न राहणे तसेच नदी-नाले परिसरात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.




राज्यातील बहुतांश भागात 20 ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरणार 




मुंबई शहरात 20 ऑगस्टच्या दुपार पर्यंत काही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता, तर पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता. 



मध्य भारतावर एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महानगरासह राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र राज्यातील बहुतांश भागात 20 ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 


गेल्या काही दिवसांच्या तुलनेत 20 तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर कमी होईल, परंतु काही ठिकाणी मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. 19 तारखेच्या तुलनेत 20 तारखेला मुंबई शहरासह मुंबई महानगरातील इतर भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील. मात्र 20 तारखेच्या दुपार पर्यंत काही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे, आणि त्यानंतर पाऊस अजून ओसरेल. 20 तारखेला सर्वात अधिक पाऊस पालघर जिल्हा (प्रामुख्याने उत्तर भाग) आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात पडण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र 20 ऑगस्ट पासूनच पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.



टिप्पण्या