massive-fire-breaks-khekadi: अकोला जिल्ह्यातील खेकडी गावात भीषण आग; फायर ब्रिगेडची गाडी बंद पडली, गावकऱ्यांनी आटोक्यात आणली आग



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यातील खेकडी गावात दोन शेतकऱ्यांच्या घरांना लागलेल्या भीषण आगीत शेतीसाठी वापरले जाणारे सगळे साहित्य भस्मसात झाले. विशेष म्हणजे, घटनास्थळी बोलावण्यात आलेली फायर ब्रिगेडची गाडी अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर बंद पडल्याने गावकऱ्यांनाच आपल्या प्रयत्नांतून ही आग आटोक्यात आणावी लागली.


ही घटना सकाळी घडली. शेतकरी चक्रभुज काकड, उमेश काकड, सुरेश मोरे आणि विपुल मोरे यांच्या घरांना ही आग लागली. आगीत कुटार, स्प्रिंकलर पाईप, थ्रेशर मशीन, झटका मशीन, भजन साहित्य आणि सिंटेक्सच्या पाण्याच्या टाक्या यासारख्या मौल्यवान शेतीसाहित्यांचा समावेश जळून खाक झालेल्या वस्तूंमध्ये झाला आहे.



आग इतकी भयंकर होती की काही मिनिटांतच सगळं साहित्य राखरांगोळी झालं. गावकऱ्यांनी वेळेवर परिस्थिती हाताळली नसती, तर आग अधिक परिसरात पसरून मोठी दुर्घटना घडली असती.



आग लागल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने अग्निशमन विभागाला संपर्क साधला. परंतु, मोठी खंत म्हणजे फायर ब्रिगेडची गाडी गावाजवळच बंद पडल्याने घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी पाणी आणि अन्य साधनांचा वापर करून अथक प्रयत्नांतून आग आटोक्यात आणली.



सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे साहित्य जळून गेल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. प्रशासनाने या शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.








टिप्पण्या