ठळक मुद्दे कावड पालखी उत्सवात रोहन निलखनचा पराक्रम! पूर्णा नदीतून शिवभक्ताचे प्राण वाचवले
संत गाडगे बाबा बचाव पथकाने दाखवला पराक्रम
समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण – SP अचिंत चांडक
गांधीग्राम येथे जीव धोक्यात घालून केलेल्या बचाव कार्याला सन्मान
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडणाऱ्या कावड व पालखी उत्सवात यंदा एका तरुणाच्या धाडसाने शिवभक्ताचे प्राण वाचले. गांधीग्राम येथील पूर्णा नदी पात्रात कावडधारी शिवभक्ताचा जीव धोक्यात आला होता. मात्र, संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकातील सदस्य रोहण मुरलीधर निलखन याने क्षणाचाही विलंब न करता जीव धोक्यात घालून उडी घेतली व त्या शिवभक्ताचे प्राण वाचवले. दाखविलेल्या या पराक्रमी धाडसाची दखल घेत अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अचिंत चांडक यांनी रोहन निलखनचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
१७ ऑगस्ट रोजी रात्री १२:३० च्या सुमारास गांधीग्राम येथे उत्सव सुरू असताना एका शिवभक्ताचा तोल जाऊन तो बोट खालून पाण्याच्या जोरदार प्रवाहात सापडला. त्याक्षणीच बचाव पथकातील रोहन निलखन पाण्यात उडी घेत त्याला सुरक्षित बाहेर ओढून आणले. या धाडसी कार्यामुळे शिवभक्ताचे प्राण वाचले.
या प्रसंगी बचाव पथक प्रमुख श्री. दीपक सदाफळे, रोहन निलखन यांचे आई-वडील यांची उपस्थिती होती. यावेळी इतर सदस्यांचादेखील गौरव करण्यात आला. पथकामध्ये विकास सदानशिव, निलेश खंदारे, निखिल बोबडे, रुषी राखोंडे, विकी गाडगे, श्याम घोंगे, प्रतीक बोरसे, आकाश बागडे, शेखर केवट, विष्णु केवत, अंकुश सदाफळे, नितीन कोलटक्के, मनीष बुटे, पद्माकर अधिक, पंकज श्रीनाथ, योगेश श्रीनाथ, पवन धारपवार, तुळशीदास फुकट, श्याम ठाकूर यांचा समावेश होता.
पोलीस अधीक्षक चांडक यांनी या पथकाचे कौतुक करताना सांगितले की, “शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी या पथकाने दाखविलेली तत्परता व धाडस कौतुकास्पद आहे. रोहन निलखन सारख्या तरुणांमुळे समाजात सेवाभाव व पराक्रमाची प्रेरणा मिळते.”
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा