ठळक मुद्दा
अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे पिकांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान, वीज पुरवठा खंडित, रस्ते-नाले नादुरुस्त; यंत्रणेला आमदारांचे तातडीचे आदेश
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिके, घरे, रस्ते आणि वीजपुरवठा यावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रणधीर सावरकर यांनी तहसील कार्यालयात कृषी विभाग, महसूल, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समिती अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन समस्या सोडविण्याचे आदेश दिले.
आमदार सावरकर यांनी स्पष्ट केले की तालुक्यातील आठ मंडळांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच पाच तालुक्यांमध्येही अतिवृष्टीमुळे हानी झाली असून त्याचे सर्वेक्षण करून त्वरित शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी सूचना त्यांनी दिली. शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई तत्काळ मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही दिले.
यावेळी घरे पडणे, खांब उन्मळणे, वीजपुरवठा खंडित होणे, रस्ते व नाले नादुरुस्त होणे यासंदर्भात विभागांनी तातडीने काम हाती घ्यावे, असे आदेश देण्यात आले. जिल्ह्यातील अनेक गावे घुसर, पळसोबढे, दहिगाव गावंडे, कोलखेड जागीर आदी भागांत मोठे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.
तहसीलदार विलास वाशिमकर, कृषी अधिकारी सौ. वाघमारे, पंचायत समितीचे आवारे, ज्युनिअर इंजिनिअर राजेश बेले, तसेच अनेक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
“नैसर्गिक आपत्तीचा सामना प्रशासन व जनतेने मिळून करावा. शेतकऱ्यांच्या भावना, ग्रामस्थांची अडचण आणि शहरी भागाची परिस्थिती लक्षात घेऊन शासन मदतीसाठी तत्पर आहे,” असे देखील आमदार सावरकर यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा