akot-festival-unique-tradition-: अनोखा उत्सव : अकोट येथे गाढवांचा पोळा; सजवलेल्या गाढवांची मिरवणूक





ठळक मुद्दे


अकोटमध्ये भोई समाजाकडून गाढवांचा पोळा गेली ५० वर्षे साजरा


रंगीबेरंगी सजावट, पूजा-अर्चा व मिरवणुकांसह उत्सव साजरा


पूर्वी उदरनिर्वाहाचे साधन असलेले गाढव आज मागे पडत चालले


परंपरेच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह, तरीही टिकवण्याचा समाजाचा प्रयत्न





भोई समाजाचा वेगळा वारसा – गाढवांचा पोळा साजरा करून कृतज्ञतेची अभिव्यक्ती



गाढवांचा पोळा – अकोटची खास सांस्कृतिक ओळख






नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  जिल्ह्यातील अकोट शहराने आज एक आगळीवेगळी परंपरा जपत गाढवांचा पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला. देशभरात शेतकरी वर्ग नंदी-बैलांचा पोळा पारंपरिक रीतीने साजरा करतो, मात्र अकोटमधील भोई समाज गेल्या पन्नास वर्षांपासून गाढवांचा पोळा साजरा करून आपली वेगळी सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवत आहे.


या अनोख्या परंपरेनुसार सकाळपासून गाढवांना स्नान घालून त्यांची सजावट करण्यात आली. रंगीबेरंगी कपडे, माळा, फिती व रांगोळीच्या पार्श्वभूमीवर गाढवांची शोभा वाढवण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. भोई समाजातील महिला व तरुणाई मोठ्या उत्साहाने या उत्सवात सहभागी झाली होती. गाढवांची पूजा-अर्चा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


गाढवावर आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या भोई समाजासाठी हा उत्सव केवळ धार्मिक वा पारंपरिक नसून सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. पूर्वी पाणी भरून नेणे, विटा वाहून नेणे, घरगुती कामात उपयोगी येणे या कारणांनी गाढवाचे महत्त्व खूप होते. मात्र आजच्या आधुनिक युगात यंत्रसामग्री, वाहने व इतर साधनसुविधांमुळे गाढवावर होणारे काम दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे या समाजाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.


सध्याच्या परिस्थितीत या परंपरेचे भवितव्य धोक्यात येईल की काय, अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली. "गाढव हे आमच्यासाठी फक्त प्राणी नाही तर कुटुंबातील सदस्यासारखे आहे. त्याच्यावर आमचे जीवन अवलंबून होते. आता आधुनिक साधनसुविधांमुळे गाढवाचे महत्त्व कमी होत असले तरी आम्ही परंपरा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो," असे एका वृद्ध समाजबांधवाने सांगितले.



अकोटमध्ये दरवर्षी होणारा हा उत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी उसळली. गाढवांचा पोळा हा अकोटची खास ओळख बनला असून सांस्कृतिक विविधतेत भर घालत आहे. या परंपरेचे संवर्धन झाले तर ग्रामीण जीवनातील एक महत्त्वाचा वारसा टिकून राहील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.





सजवलेल्या गाढवांसह पारंपरिक पोळा साजरा करताना अकोटकर.




गेल्या पन्नास वर्षांची परंपरा – गाढवांची पूजा व मिरवणूक अकोटमध्ये.





गाढवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी पूजा-अर्चा अकोट शहरात.

टिप्पण्या