नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला पूर्व मतदारसंघातील अकोट तालुक्यात सलग दोनदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रणधीर सावरकर यांनी अधिकाऱ्यां सोबत प्रत्यक्ष शिवारात जाऊन पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. कोणीही शेतकरी अथवा नागरिक नुकसान भरपाईपासून वंचित राहता कामा नये, अशा कडक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
माहे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात खापरवाडी, वरूर जवळका, सावरगाव, विटाळी, पुंडा आदी पंचक्रोशीत झालेल्या अतिवृष्टीनंतर बुधवारी (२७ ऑगस्ट) पुन्हा पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे शेतीतील पिके पाण्याखाली गेली, जमीन खरडून गेली तसेच घरांचेही नुकसान झाले. आमदार सावरकर यांनी तहसीलदार चव्हाण, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासोबत संयुक्त पाहणी करून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले.
या पाहणीत त्यांनी शेतांतील साचलेले पाणी, पिकांवरील बोंड अळी, हुमणी आळीमुळे झालेले नुकसान, पुरामुळे खरडून गेलेली शेती व खराब झालेले रस्ते याची पाहणी केली. तसेच नदी-नाले उथळ झाल्याने पाणी शेतात घुसून नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणत नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले.
वरूर येथे झालेल्या आढावा बैठकीत आमदार सावरकर यांनी शेतकरी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणालाही भरपाईपासून वंचित ठेवले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. पाहणी दौऱ्यादरम्यान तहसीलदार चव्हाण, कृषी अधिकारी अजित वासेकर यांच्यासह स्थानिक भाजपा महायुती पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा