akola-rain-electric-pole-fallen: अकोल्यात मुसळधार पावसाने घातला थैमान ; जेल चौक परिसरात विद्युत पोल कोसळला




नीलिमा शिंगणे जगड 

अकोला शहरात आज (गुरुवार 28 ऑगस्ट रोजी) सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. तब्बल दोन तास चाललेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. वाहतूक व्यवस्था कोलमडली तर वीजपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले.


जेल चौक परिसरात पावसाच्या धारेमुळे एक विद्युत पोल कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. याचवेळी मुख्य मार्गावर विद्युत वाहिनीचा तार खाली पडल्याने रहदारी काही काळ ठप्प झाली. परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.



मात्र, विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. कर्मचाऱ्यांनी भर पावसातच तातडीने विद्युत तार कापून मार्ग मोकळा केला. या कारवाईत वाहतूक पोलिसांनीही पुढाकार घेत वाहनचालकांना पर्यायी मार्ग दाखवून कोंडी दूर करण्यास हातभार लावला.


सध्या जेल चौक परिसराचा वीजपुरवठा खंडित असून, तो सुरळीत करण्यासाठी विद्युत विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. पावसामुळे झालेल्या या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



दरम्यान, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, मुसळधार पावसामुळे वीज वाहिन्या किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या जवळ न जाण्याचे निर्देश दिले आहेत.


Video news link⬇️

अकोल्यात जोरदार पाऊस;30ऑगस्ट पर्यंत पाऊस!






टिप्पण्या