भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील सिविल लाइन्स पोलीस स्टेशन हद्दीत आणखी एक धक्कादायक प्रकार उजेडात आला. काल शुक्रवार 4 जुलै रोजी सायंकाळी एका विद्यार्थिनीचा ऑटोरिक्षा चालकाने विनयभंग करुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केल्याने पुढील अनर्थ टळला. बाहेरगावहून शिकवणी करिता येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अकोला असुरक्षित असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
नायगाव येथील रहिवासी जाफर सुभेदार खान असं आरोपीचे नावं असून, त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनच्या निरीक्षक मालती कायते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोन तासाच्या आत आरोपीला अटक केली.
याबाबत मुलीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पीडित मुलगी अकोला मध्यवर्ती बस स्थानकापासून रूमकडे ऑटोरिक्षाने जात असताना या ऑटोरिक्षा चालकाने तिचा विनयभंग केला. त्याच्या तावडीतून सुटकेसाठी तिने प्रतिकार केला. मात्र, रिक्षा चालकाने तिच्या हाताला आणि दंडाला चावा घेतला. त्यानंतर रिक्षातून तिने पळ काढला. यानंतर मुलीने पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची नोंद करून लगेच तपास हाती घेतला. मुलीच्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन पोलिसांनी ऑटोरिक्षा चालकाला अटक केली. जाफर खान सुभेदार खान (रा.बकेट कारखान्या जवळ शहनवाजपुरा, नायगाव, अकोला.) असं अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एक 16 वर्षीय विद्यार्थिनी ही अकोला शहरात नीट परीक्षा NEET EXAM चे क्लासेस करीत आहे. त्यासाठी तिने राहायला खोली भाड्याने केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ती आजारी होती. त्यामुळे परतवाडा येथे गावी गेली होती. काल दुपारी एस टी बसने अकोल्याकडे रवाना झाली. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ती अकोला बसस्थानकावर पोहचली. त्यानंतर खोलीवर जाण्यासाठी एक ऑटोरिक्षा ठरविला, आणि त्यामध्ये बसून रूमकडे रवाना झाली. मात्र ऑटो रिक्षा चालकाने ऑटोरिक्षा वेगळ्याच रस्त्यावर नेला, तिला संशय आल्याने तिने मित्राला फोनवर सांगितलं. दरम्यान, अगदी थोड्या वेळातच चालत्या रिक्षात चालकाने मुलीचा हात पकडून स्वतःजवळ ओढत तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने प्रतिकार केला असता त्याने मुलीच्या डाव्या हातावर आणि हाताच्या दंडाला चावा घेतला. थोड्या वेळातच तिने हिमतीने स्वतःची सुटका करत ऑटोरिक्षा मधून पळ काढला. आणि थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगत रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनाविलंब घटनेचे गांभीर्य ओळखून रिक्षा चालकाचा शोध घेत आरोपीस ऑटोरिक्षासह अटक केली. पीडित मुलीने ऑटोरिक्षाचा क्रमांक ऑटोरिक्षामध्ये बसण्याआधीच नोंद केला होता. त्यामुळे पोलिसांना ऑटो चालकाचा शोध घेण्यास मोठी मदत मिळाली. भारतीय न्याय संहिता कलम 74,118,(1),137 (2) सहकलम 8 पॉक्सो नुसार जाफर खान सुभेदार खान याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेला एमएच 30 ई 9497 या क्रमांकाचा ऑटोरिक्षा सुद्धा पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. अकोला शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस रोड ते अनोळखी ठिकाणी ही घटना घडली आहे.
बाहेरगावहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अकोल्यात धोका!
अकोला शहरात बाहेरगावाहून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठया संख्येने शिक्षणासाठी येतात. मात्र त्यांच्याकडून शहरातील सराईत गुन्हेगार खंडणी मागतात. खंडणी न दिल्याने विद्यार्थ्यांना मारहाण होते, असे बरेच गुन्हे उघडकीस आले आहेत. एका विद्यार्थ्याची केवळ पन्नास रुपयांसाठी हत्या झाली. तर एका विद्यार्थ्याने या गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तर काहींना मारहाण झालेली आहे. या संदर्भात अनेक तक्रारी दाखल आहेत, परंतू पोलिसांकडून कडक कारवाई होत नसल्याने दिवसागणिक या गाव गुंडांची दहशत वाढत आहे.
अकोल्यात येणारे प्रवासी असुरक्षित!
बाहेरगााहून अकोला शहरात येणाऱ्या प्रवाश्याची ऑटोरिक्षा चालकांकडून फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. यातूनच एक गंभीर घटना देखील घडली होती. 31मार्च 2023 रोजी अकोल्यात ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. बस स्थानकावर पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर तिच्या अंध पतीसमोरच ऑटोरिक्षा चालकाकडून अत्याचार झाल्याचा घृणास्पद प्रकार उजेडात आला होता. या प्रकरणात आरोपी गुलाम रसुल शेख मतीनला पोलीसांनी अटक केली होती. एक अंध दाम्पत्य अकोला जिल्ह्यातील दिग्रस येथे आपल्या नातेवाईकाकडे जात होते. रात्री बसस्थानकावर उशीर झाल्याने गाडी नसल्याने एका ऑटोरिक्षा चालकाने त्यांना हेरलं. रेल्वे स्टेशनवर सोडुन देतो असं सांगत आरोपी गुलाम रसुल शेख मतीन याने दोन्ही अंध पती-पत्नीला निर्जन स्थळी नेत अंध विवाहितेवर अत्याचार केला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा