भारतीय अलंकार न्यूज 24
बुलढाणा: आषाढी एकादशी निम्मित पंढरपूरहून श्रीविठ्ठल दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यांनी भरलेल्या एसटी बसचा चिखलीजवळ महाबीज कार्यालयासमोर भीषण अपघात झाला. 7 जुलै 2025 रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात बस दुभाजकाला धडकून उलटली, ज्यामध्ये 30 पेक्षा अधिक वारकरी जखमी झाले. जखमींना तात्काळ चिखली आणि बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, खामगाव आगाराची एमए 40 वाय 5830 क्रमांकाची एसटी बस पंढरपूरहून 52 वारकऱ्यांना घेऊन परतत होती. चिखलीजवळ महाबीज कार्यालयासमोर अचानक बस अनियंत्रित झाली आणि दुभाजकाला धडकली आणि उलटली. हा अपघात एवढा भीषण होता की बसचा पुढचा भाग चकनाचुर झाला. अपघातात 30 हून अधिक वारकरी जखमी झाले आहेत, त्यापैकी 10 ते 15 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीचा हात पुढे करत बचावकार्य सुरू केले. चिखली पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. रात्रीच्या अंधारात अनेकांनी जखमींना मदत केली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा