darshan-palaskar-murder-case: नऊ वर्षीय दर्शनचा सावत्र बापानेच आवळला गळा; मुलगा बेपत्ता झाल्याचा केला होता बनाव…
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोट तालुक्यात आज दुपारी मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपला नऊ वर्षीय मुलगा बेपत्ता असून त्याचा लवकर शोध घ्यावा, अशी पोलिसांकडे आर्त याचना करणारा बापचं मुलाचा मारेकरी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या बापाने नात्याला काळीमा फासून चिमुकल्याची निर्घृण हत्या करून मृतदेह अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
प्राप्त माहितीनुसार भविष्यात संपत्तीत हिस्सा मागणार, या संशयातून सावत्र बापाने त्याच्या मित्राच्या मदतीने हत्याकांड घडवून आणलं. दर्शन वैभव पळसकर असं मृतक मुलाचे नाव आहे. तर आकाश साहेबराव कान्हेरकर (राहणार हिरापूर ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती) असं मारेकरी सावत्र बापाचं नाव आहे. तर गौरव वसंतराव गायगोले (रा. हिरापूर ता. अंजनगाव जिल्हा अमरावती.) असं मारेकऱ्याला मदत करणाऱ्या साथीदाराचे नाव आहे. अकोट पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता नुसार खुनाचे गुन्हे दाखल केले आहे.
घटनेची हकीकत अशी की, काल बुधवार 2 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास कुणालाही न सांगता दर्शन घराबाहेर निघून गेला असल्याची आकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. मुलाच्या बेपत्ता प्रकरणी आईने तक्रार दिली होती. विषेश म्हणजे तक्रार दाखल करताना मारेकरी सावत्र बाप मुलाच्या आईसोबत पोलीस ठाण्यात गेला होता. मुलाला लवकर शोधून काढावे, अशी विनंती केली.
दरम्यान मुलाच्या बेपत्ता प्रकरणी तपास सुरू असतानाच सावत्र वडिलांवर पोलिसांना संशय आला. कारण, अकोट शहरातल्या चौकातील नुकतेच लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात वडिलांसोबत मुलगा जात असताना दिसून आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी सावत्र वडिलांची कसून चौकशी केली असता त्याने सावत्र मुलाला कायमचं संपवलं असल्याचे उघड केले. सावत्र वडील आकाश आणि त्याचा मित्र गौरव या दोघांनी दर्शनला जंगलाकडे दुचाकीवर नेत त्याची हत्या केली. त्यानंतर दर्शनचा मृतदेह अमरावती अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल परिसरात फेकून दिला.
दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना समजतात पोलिसांनी काल रात्रीपासून जवळपास 12 तास जंगल परिसरात शोध मोहीम राबवित अख्खं जंगल पिंजून काढले. ही शोध मोहीम यशस्वी झाली. मुलाचा मृतदेह जंगलात आढळला. या शोध मोहीममध्ये 7 पोलीस अधिकारी आणि 60 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, सद्यस्थितीत मृतदेह शव विच्छेदनासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास सुरू असल्याची माहिती आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा