crime-autorickshaws-vandaliz: अकोल्यात गावगुंडांची दहशत: माळीपुरा भागात दोन ऑटोरिक्षांची तोडफोड; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पुण्यातील कोयता गँग प्रमाणेच अकोला शहरातही गावगुंडांनी दहशत पसरवली आहे. मंगळवारी पहाटे रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञातांनी दोन ऑटो रिक्षांची तोडफोड केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  यावर आता पोलीस काय कारवाई करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


शहरात असामाजिक घटकांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ज्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशीच एक धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे 2 वाजता रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळीपुरा येथील आझाद चौकात घडली. अज्ञात गुंडांनी परिसरात गोंधळ घातला आणि दोन ऑटो रिक्षांचे प्रचंड नुकसान केले. 




मिळालेल्या माहितीनुसार, रेवन गायकवाड आणि नरेंद्र बाळाभाऊ रणपिसे यांच्या ऑटो रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे. गुंडांनी रिक्षांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले आहे.



 ही संपूर्ण घटना परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात तरुण वाहनांचे नुकसान करून घटनास्थळावरून पळून जाताना स्पष्ट दिसत आहेत. 



या घटनेमुळे माळीपुरा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरा अशा घटना घडत असल्याने नागरिकाना असुरक्षित वाटत आहेत. 



या संदर्भात रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता रामदासपेठ पोलिस या गुंडांना कायद्याच्या कचाट्यात कसे आणतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 




भविष्यात अशा घटनांना होवूच नये यासाठी पोलिसांकडून तातडीने आणि कठोर कारवाईची नागरिकांना अपेक्षा आहे.

टिप्पण्या