news-court-accused-acquitted: “बिलांवर स्वाक्षऱ्या नाहीत, क्रमांक सलग आणि संशयास्पद”...अधिवक्ता शिवम शर्मा यांच्या परखड युक्तिवादाने आरोपीची निर्दोष सुटका




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आठव्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी, अकोला न्यायालयात सुरू असलेल्या चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने 28 जुलै रोजी आरोपी बृजेश शिवशंकर ठाकूर याला निर्दोष जाहीर केले आहे. या निर्णयात बचाव पक्षाचे अधिवक्ता शिवम . एस. शर्मा यांच्या स्पष्ट, पुराव्यावर आधारित आणि काटेकोर युक्तिवादांची भूमिका निर्णायक ठरली.


काय आहे नेमके प्रकरण


आनंद अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स या संस्थेच्या मालकाने असा दावा केला होता की, आरोपीने त्यांच्याकडून जानेवारी 2017 ते जानेवारी 2018 दरम्यान एकूण ₹5,00,000/- चारा उधारीवर खरेदी केला होता आणि त्याच रकमेच्या परतफेडीसाठी दिनांक 23 फेब्रुवारी 2018 रोजी चेक दिला होता. मात्र चेक तिन वेळा बँकेत सादर केला असता, ‘Funds Insufficient’ आणि ‘Payment Stopped’ या कारणांमुळे तो वटविला गेला नाही.


अधिवक्ता शर्मा यांचा ‘बिल सीरियल नंबर’ वर हल्लाबोल


अधिवक्ता शर्मा यांनी खटल्यात तगडा मुद्दा उपस्थित केला की, तक्रारदाराने सादर केलेली बिले (Exh. 40) कोणत्याही प्रकारच्या स्वाक्षऱ्यांनी सज्ज नाहीत. त्यातही सर्व बिलांचे क्रमांक 64 ते 97 पर्यंत सलग आहेत, आणि त्यामुळे त्यांची सत्यता शंकास्पद ठरते. हा महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा न्यायालयाने मान्य केला.


खातेवह्या नाहीत, व्यवहाराची नोंद नाही


तक्रारदाराने असा दावा केला की, ते दररोजची खरेदी-विक्रीची नोंद ठेवतात, मात्र ना खातेवह्या, ना लेजर, ना आय.टी. रिटर्न सादर करण्यात आले. ॲड. शर्मा यांनी हे दाखवून दिले की, जर व्यवहार खरोखर झाला असता तर हे सर्व कागदपत्रे सादर झाली असती.


कोणताही व्यापारिक व्यवहार नव्हता - बचाव पक्षाचा दावा


बचाव पक्षाने स्पष्ट केले की, हा चेक आरोपीच्या भावाने म्हणजेच अरुण ठाकूर याने टीव्ही खरेदीसाठी उधारी घेण्यासाठी घेतला होता. अरुण ठाकूर याने स्वतः कोर्टात साक्ष दिली की त्याने ₹50,000/- उधारीवर घेतले होते आणि नंतर परतफेडही केली. यावरून, मूळ चेक चुकीच्या पद्धतीने वापरल्याचा आरोप युक्तिवादात मांडण्यात आला.


 न्यायालयाचे निरीक्षण


“तक्रारदार कोणतेही वैध दस्तऐवज सादर करण्यात अपयशी ठरले. बिले स्वाक्षरीविना असून, व्यवहाराचा स्पष्ट पुरावा नाही. आरोपीने सादर केलेली बाजू अधिक संभाव्य वाटते.”




निर्णय


त्यामुळे न्यायालयाने ठाम मत नोंदवत, एन.आय. अ‍ॅक्ट कलम 138 अंतर्गत आरोपीवर दोष सिद्ध न झाल्यामुळे त्याला निर्दोष मुक्त केले.





दरम्यान, हे प्रकरण सिद्ध करतं की, एखाद्या तांत्रिक मुद्द्यावर आधारित काटेकोर आणि अभ्यासपूर्ण युक्तिवाद संपूर्ण खटल्याचं पारडं फिरवू शकतो. या संपूर्ण प्रकरणात न्यायालयात आरोपीची बाजू सक्षम आणि अभ्यासपूर्ण मुद्दे मांडताना ॲड. एस. एस. शर्मा यांची कामगिरी निश्चितच वाखाणण्यासारखी आणि कौतुकास्पद आहे. यासाठी ॲड. शिवम शर्मा यांचेवर अकोला न्यायालय परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ॲड. शिवम शर्मा हे अकोला बार असोसिएशनचे सिनियर सेक्रेटरी आहेत.

टिप्पण्या