come-to-jodhpur-vision-2047: "पधारो जोधपुर - विजन 2047” आंतरराष्ट्रीय माहेश्वरी महाकुंभ व ग्लोबल एक्सपोची नोंदणी सुरू


ठळक मुद्दा

माहेश्वरी युवा संगठनचा नोंदणीसाठी प्रदेशस्तरीय पुढाकार




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सकल माहेश्वरी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभेच्या वतीने अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे सभापती संदीप काबरा, जोधपुर यांच्या पुढाकारात नववर्षात राजस्थान राज्याच्या जोधपूर येथे आंतरराष्ट्रीय माहेश्वरी महाकुंभचे दोन दिवसीय तथा ग्लोबल एक्सपोचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे. या भव्य आंतरराष्ट्रीय महाकुंभ मध्ये सकल माहेश्वरी समाजाच्या युवक युवती व अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी माहेश्वरी युवा संगठन प्रदेशस्तरावर पुढाकार घेत असून समाजातील प्रत्येक घटकाच्या नोंदणीसाठी नोंदणी अभियान आतापासूनच सुरू केले असल्याची माहिती माहेश्वरी युवा संगठनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. 



स्थानीय माहेश्वरी भवन येथे मंगळवारी संपन्न झालेल्या या पत्रकार परिषदेत महासभेचे प्रा. डॉ. रमण हेडा, युवा संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष नागपूर येथील शरद सोनी, युवा संगठनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष सागर लोहिया, प्रदेश युवा समन्वयक प्रा. डॉ. राम बाहेती, सचिव अमोल बजाज, कारंजा, कोषाध्यक्ष अनुज मुंदड़ा नांदुरा, राष्ट्रीय प्रतिनिधि सचिन झंवर भंडारा, जोधपुर महाकुंभचे अकोला जिल्हा संयोजक राजेश सोमाणी व पश्चिम विदर्भ संयोजक डॉ गोविंद झंवर, मेहकर उपस्थित होते.



अखिल भारतीय माहेश्वरी महासभेने समाजाला, "पधारो जोधपुर"- विजन 2047 हे उद्दिष्ट दिले आहे. माहेश्वरी समाजाचे एकत्रीकरण, सामजिक सुसंवाद, व्यापार उद्योगचे ग्लोबल नेटवर्क, ग्रोथ व संधी, सामाजिक दृष्टिकोन, वैदिक ते ग्लोबल युग ही या महाकुंभाची थीम असून आंतरराष्ट्रीय माहेश्वरी महाकुंभाच्या रूपाने हे महासंमेलन होत आहे. 10 व 11 जानेवारी 2026 रोजी मारवाड इंटरनॅशनल सेंटर, पॉलीटेक्निक कॉलेज, सूर्यनगरी जोधपुर, राजस्थान येथे देश विदेशातून 75 हजार पेक्षा अधिक समाजजन सहभागी होत असलेले हे दोन दिवसीय सामजिक आंतरराष्ट्रीय महाधिवेशन होणार असून यात समाजाच्या विविध समस्या, विकास आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मार्गदर्शन, सांस्कृतिक उद्बोधन, व्याख्यान, परिसंवाद, नृत्य, नाटिका, काव्य गोष्टी आदी नवोपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.




या सोबतच दिनांक 9 ते 11 जानेवारी 2026 पर्यन्त माहेश्वरी ग्लोबल एक्सपो ही तीन दिवसीय जागतिक व्यापार उद्योगावर आधारित व्यापार उद्योग परिषद व प्रदर्शनी होणार आहे. 



यामध्ये समाजातील 500 हून जास्त उद्योगपतीचे स्टॉल व यशस्वी स्टार्टअपचे प्रदर्शन, ग्लोबल नेटवर्क, ग्रोथ, समाजाचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग, व्यापाराच्या संधी, आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या या विश्वात पारंपारिक उद्योग, व्यापारा पुढील समस्या, व्याख्यान, चर्चासत्र, उत्पादन प्रदर्शनी आदींची रेलचेल राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 



पश्चिम राजस्थान प्रादेशिक माहेश्वरी सभेच्या अतिथ्यात आयोजित या महाकुंभ व ग्लोबल एक्सपोत सहभागी होण्याच्या नोंदणीसाठी माहेश्वरी युवा संगठनने प्रदेश स्तरावर पुढाकार घेतला असून नोंदणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी राजेश सोमानी अथवा प्रा. राम बाहेती  यांच्याशी संपर्क करून समाजातील युवक, युवती, महिला पुरुषांनी आपआपली नावे नोंदवून नववर्ष पर्वावर आयोजित या आंतरराष्ट्रीय माहेश्वरी महासंमेलन व ग्लोबल एक्सपो मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजाची एकजुटता प्रदर्शित करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 





यावेळी पत्रकार परिषदेत माहेश्वरी युवा संगठनचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या