body-found-flyover-underpass: उड्डाणपुल भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात तरंगताना दिसला मृतदेह …



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मदनलाल धींग्रा चौक बस स्थानक समोरील अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपूल भुयारी मार्गात पावसाच्या साचलेल्या पाण्यात आज गुरुवार 17 जुलै रोजी सकाळी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह काही नागरिकांना तरंगताना दिसल्याने शहरात खळबळ उडाली.


 

घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी  पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. हा मृतदेह 40 ते 50 वयो गटातील असावा, असा कयास आहे.



दरम्यान, सिटी कोतवाली पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील लोकांशी चौकशी करण्यात येत आहे. तसेच अलीकडील काही दिवसांपासून बेपत्ता झालेल्या व्यक्तींबाबतच्या तक्रारींचाही अभ्यास केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.


शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी करताहेत डोळेझाक 

मदनलाल धींग्रा चौक हे अकोला शहरातील दाट वर्दळीचे ठिकाण असूनही या परिसरात रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाशव्यवस्था, अस्वच्छता आणि सीसीटीव्ही व्यवस्था नसणे ही मोठी दुर्लक्षित बाब आहे. तसेच पुलाखाली अनेक बेघर नागरिकांनी घर केलेली आहेत. या लोकांची दररोजची भांडण मारपीट रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना दिसते. यामुळे अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मात्र प्रशासनाला ही बाब अजिबात दिसत नसल्याने भविष्यात मोठी घटना घडल्यास आश्चर्य वाटायला नको. थोडा जरी पाऊस आला तरी उड्डाणपुल भुयारी मार्गाला तरण तलावाचे स्वरूप येते. ही नित्याची बाब झाली आहे. मात्र प्रशासनाकडे येथील साचलेले पाणी त्वरित काढून मार्ग वाहतुकीस मोकळा द्यावा, यासाठी कुठलीही यंत्रणा नाही, ही दुर्दैवी बाब आहे. एकंदरीतच शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यासर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करुन भविष्यात मोठी काहीतरी दुर्घटना व्हावी याची जणू वाट बघताहेत, अश्या संतप्त प्रतिक्रिया आजच्या घटनेनंतर अकोल्यातील नागरिकांनी व्यक्त केल्या.



टिप्पण्या