fake-doctor-scam-in-akola-city: अकोल्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट: कंपाऊंडर बनला डॉक्टर; मनपाने उगारला कारवाईचा बडगा, जावेद शेख वर गुन्हे दाखल





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून, या गंभीर प्रकाराबाबत आरोग्य यंत्रणा उदासीन असल्याचा दिसून येत आहे.मात्र अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या एका बोगस डॉक्टर वर अखेर तीन दिवसानंतर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बोगस डॉक्टरांविरुध्द अकोला महानगर पालिकाने कारवाईचा बडगा उचलला असून जुने शहर भागातील हरिहर पेठ मधील बोगस डॉक्टर जावेद शेख याच्यावर पहिली कारवाई केली आहे. या कारवाईमुळे आता शहरातील इतर बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.




अकोला शहरात एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील हरिहर पेठ, जुने शहर येथे विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. जावेद शेख याच्या विरुद्ध ही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य पथकाने आणि जुने शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने धाड टाकून तपासणी केली असता या तपासणीदरम्यान संबंधित डॉक्टरकडे वैद्यकीय पात्रतेची कागदपत्रे नसल्याचे दिसून आले.  तसेच रुग्णांची नोंदणी न करता त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे आढळले. त्या सोबतच मोठा औषधांचा साठा सुद्धा सापडला आहे. या हॉस्पिटलला मुंबई नर्सिंग होम एक्ट, 1949 अन्वये मान्यता नसल्याचेही उघड झाले. यावेळी हॉस्पिटलमधील 8 रुग्णांवर उपचार सुरू होते. काही रुग्णांना सलाईन देण्यात आलेले होते.  अन्य औषधे साठवलेली होती. विशेष  म्हणजे हा डॉक्टर कोणताही नावाचा फलक न लावता उपचार करत होता.   बी.ए.एम.एस असल्याचे लोकांना सांगायचा.  



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारा वर्ष हा बोगस डॉक्टर मुंबईतील एका डॉक्टर कडे कंपाउंडर म्हणून काम करीत होता. अकोला शहरात गेल्या दोन ते तीन वर्षापासून हा बोगस डॉक्टर आपला व्यवसाय करीत आहे.


अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक ए.सी. माणिकराव व श्री गोतमारे यांना पुढील कारवाईसाठी बोलावण्यात आले. तपासणीदरम्यान कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसल्याचे दिसून आल्यामुळे बेकायदेशीर रुग्णालय चालवण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. 


पुढील कारवाईसाठी प्रकरण पोलिस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले आहे.  मात्र अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या बोगस डॉक्टरच्या धंद्या संदर्भात महापालिकेला आणि अन्न औषध प्रशासनाला आजपर्यंत माहिती का मिळाली नाही असा यक्ष प्रश्न उपस्थित होत आहे. या कारवाईनंतर देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या आरोपी डॉक्टराचे नाव कारवाई नंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी गुप्त ठेवले होते. कारवाई दरम्यान प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांना छायाचित्र काढण्यास मनाई करण्यात आली होती. 




1) बोगस डॉक्टर विरुद्ध कारवाई करिता तीन दिवसाचा कालावधी का लागला ?


2) बोगस डॉक्टर कडे परवाना नसूनही औषधांचा एवढा साठा कसा मिळून आला ?


3) परवाना नसलेल्या डॉक्टरला औषधांचा पुरवठा कोणत्या आधारावर आणि कुणी केला ?


4) बोगस डॉक्टरांच्या विरोधात IMA आवाज उठवणार काय?


असे अनेक प्रश्न यानिमित्त उपास्थित होत आहेत. 


शहरात आणि जिल्ह्यात आणखी काही बोगस डॉक्टर असून त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.  





डॉ.आशिष गिऱ्हे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा अकोला आणि नितीन लेव्हरकर, ठाणेदार जुने शहर अकोला यांच्या नेतृत्वात या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

टिप्पण्या