भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सन २०१९ मध्ये तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत एका ९ वर्षीय शाळकरी मुलीवर लैगिंक अत्याचाराची घटना घडली होती. समाज मन सुन्न करणाऱ्या या घटनेतील आरोपी चंदु उर्फ चंद्रभान कुकडेला २० वर्ष सश्रम कारावास व ६० हजार रूपये दंड अशी शिक्षा अकोट न्यायालयाने आज २६ जून २०२५ रोजी सुनावली आहे. अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व विशेष न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी हा निकाल दिला आहे. महाराष्ट्रात आज सर्वत्र सामाजिक न्याय दिन साजरा होत असताना हा निकाल आल्याने पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
असा आहे निकाल
तेल्हारा पोलीस स्टेशनचे फाईल वरील अपराध क्र. २२०/२०१९ भांदवीचे कलम ३७६, ३७६ (अ) (ब) ३, ४, ६ पोक्सो कायदा मधील आरोपी चंदु उर्फ चंद्रभान गोविंदराव कुकडे (वय ५० वर्ष राहणार राणेगाव तालुका अकोट जिल्हा अकोला) याने स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंधेला तेल्हारा येथे एका ९ वर्षीय विद्यार्थीनीवर लैगींक अत्याचार केल्याचे सिध्द झाल्याने, न्यायालयाने आरोपीला २० वर्ष कठोर कारावासाची शिक्षा ६०,०००/- रूपये दंडासह ठोठावली. दंड भरल्यास दंडाची रक्कम पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी तसेच दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त ७ महिने कठोर कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असे देखील आदेशामध्ये नमूद केले आहे.
अशी घडली घटना
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, ९ वर्षीय पिडीताच्या वडीलांनी तेल्हारा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, तेल्हारा येथे परीवारासह राहतो व शेतमजूरी करतो. पीडिता मुलगी ही तेल्हारा येथे शिक्षण घेत होती. दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी फिर्यादीने पिडीतेला दुस-या दिवशी १५ ऑगस्ट असल्याने तिला शाळेत जाण्याकरीता बुट विकत घेउन दिले व तिला बस स्थानकाचे गेट जवळ सायंकाळी सोडून घरी जाण्यास सांगितले कारण फिर्यादीची आई सरकारी दवाखाण्यात होती. त्यानंतर फिर्यादी सायंकाळी घरी आले असता पिडीता घरी दिसली नाही. ती काका कडे गेली असेल म्हणून तिचा शोध घेतला नाही. रात्री ८.०० वाजताच्या सुमारास काकांचा फिर्यादीला फोन आला की, पिडीता ही पाथर्डी येथे सापडली असून डॉक्टरांच्या दवाखाण्यात आहे. त्यामुळे फिर्यादी व त्यांचा पुतण्या पाथर्डी येथे दवाखाण्यात गेले व पिडीतेला विचारपूस केली की येथे कशी काय आली तेव्हा पिडीतेने आम्हाला सांगितले की, मी बस स्थानकाकडून घराकडे पाई पाई येत असतांना मला पुढे थोड्या अंतरावर पाठीमागून मोटरसायकल स्वाराने म्हटले तुला घरा पर्यंत सोडतो. त्याने घराकडील पेटोलपंपा कडे घेवून आला असता पिडीतेने त्याला मोटरसायकल थांबावयाला सांगितली परंतु आरोपी चंदु कुकडे ने मोटरसायकल थांबवली नाही. व सरळ एका रस्त्याने गावाकडील नदीजवळ मोटरसायकल थांबवली. त्याने पिडीतेला नदीत अंघोळ करायला सांगितले अशा दिनांक १४.०८.२०१९ रोजीच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये प्रथम भादंविचे कलम ३६३-अ प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला.
बालकल्याण समिती समक्ष बयाण
९ वर्षीय अल्पवयीन पिडीतेने दिनांक १६.०८.२०१९ रोजी बालकल्याण समिती अकोला यांचे समक्ष झालेल्या बयाणामध्ये सांगितले की, आरोपीने तिला नदीत नेवून तिचे कपडे काढले व तिचेवर लैगिंक अत्याचार केला. तसेच पिडीता नदीपात्रातून रस्त्यावर आली असता एका ऑटोरिक्षावाल्याने तिला दवाखाण्यात नेले. त्यानंतर तिच्या वडीलांना फोनवर माहिती देण्यात आली.
प्रकरणाचा तपास
या प्रकरणातील तपास अधिकारी तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सुधाकर गवारगुरू यांनी तपासामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हाराच्या गेटसमोरील दिनांक १४.०८.२०१९ रोजीचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले असता पीडीत मुलीला आरोपी मोटरसायकलवर बसवून घेवून जातांना दिसून आला. त्यानंतर पोलीसांनी आरोपी चंदु कुकडेला ०४.०९.२०१९ रोजी या प्रकरणात अटक केली.
मोटार सायकल मालकाची साक्ष
आरोपीने मोटरसायकल क्रमांक एमएच-३० सी-४०५८ ही लाल रंगाची हिरोहोन्डा ज्यावर बसून पिडीतेला नेले होते त्या गाडीच्या मालकाने देखील न्यायालयामध्ये साक्ष दिली की, आरोपी चंदु कुकडे हा नातेवाईक असल्याने मी त्याला ओळखतो १३. ०८.२०१९ च्या रात्री वरील मोटरसायकल मी आरोपीला दिली होती. १८.०८.२०१९ रोजी आरोपीच्या मुलाने वरील मोटरसायकल तोडमोड झालेली आणून दिली. गाडीची कागदपत्रे हरवली होती. याबाबत वाडेगाव पोलीस चौकीत वरील मोटरसायकलच्या मालकाने आरोपी विरूध्द लेखी तक्रार दिली होती.
वैद्यकीय अहवाल
वैद्यकीय अधिका-यांनी पिडीतेची वैद्यकीय तपासणी केली असता अहवालामध्ये पिडीतेच्या खाजगी भागावर जखमा आढळल्याचा अहवाल डॉक्टरांनी या प्रकरणात दिला व तशी साक्ष न्यायालयात दिली.
पीडिताची साक्ष
या प्रकरणात अल्पवयीन पिडीत मुलीने देखील साक्ष देतांना आरोपीला ओळखले व न्यायालयासमक्ष सांगितले की, यानेच माझ्यावर लैगिंक अत्याचार केला आहे.
१७ साक्षीदारांच्या साक्ष
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी प्रामुख्याने अल्पवयीन पिडीता तसेच डॉक्टर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट वरील रखवालदार, पिडीताचे आई-वडील, तपास अधिकारी असे एकूण १७ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयामध्ये नोंदविल्या.
सरकारी वकील अजित देशमुख यांचा युक्तिवाद
या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी आज शिक्षेसंबंधी न्यायालयात युक्तीवाद केला की, आरोपी चंदु कुकडेनी स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंधेला एका अल्पवयीन ९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैगिंक अत्याचार केल्याचे साक्षीपुराव्यावरून सिध्द झालेले आहे. आरोपीने केलेला अपराध हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते त्यामुळे अशा गंभीर प्रकरणामध्ये आरोपीला कुठल्याही प्रकारची दया न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी जेणेकरून अशा अपराधीक प्रवृत्तींना आळा बसेल व कायद्याचा धाक राहील.
आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद
न्यायालयात आरोपीच्या वकीलांनी युक्तीवाद केला की, आरोपी हा एकटाच कमवता आहे. त्याच्या घरातील सदस्य त्याच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे तो ०४.०९.२०१९ पासून या प्रकरणात कारागृहात आजपर्यंत बंदिस्त असल्याने त्याला सोडून देण्यात यावे.
आरोपीस शिक्षा
न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद नंतर आरोपी चंदु उर्फ चंद्रभान कुकडे याला २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ६०,०००/- रूपये दंडासह ठोठावली आहे.
आरोपी विरूध्द दोषारोपपत्र
या प्रकरणाचा संपूर्ण तपास तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक सुधाकर गवारगुरू यांनी केला. आरोपी विरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात पैरवी म्हणून तेल्हारा पोलीस स्टेशनचे पो.हे. कॉ रामेश्वर राउत हे नियुक्त होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा