भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: सन 1932 पासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्व डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या येथून जवळच असणाऱ्या बाभूळगाव येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयास एमबीए अभ्यासक्रमाची मान्यता मिळाली असल्याची माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दिली.
शनिवारी या संदर्भात शिवाजी महाविद्यालयात पत्रकार परिषद संपन्न झाली. यात त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या एकंदर शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. महानगरापासून जवळच असणाऱ्या बाभुळगाव येथे 1983 झाली संस्थेने अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयास नॅकद्वारे ए ग्रेडचे मानांकन मिळाले.येथे मास्टर ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए या नवीन अभ्यासक्रमाला या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात होत असून या अभ्यासक्रमाला एआयसीटीई व शासकीय मान्यता मिळाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात या व्यतिरिक्त बीई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व बी ई कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग शाखेत सहा अतिरिक्त जागा वाढविण्यात आल्या आहेत. या संदर्भात या महाविद्यालयाचे रिधोरा येथे 27 एकर जागेत विस्तारीकरण होत असून दोन शाखेत चालणारे हे राज्यातील एकमेव महाविद्यालय ठरणार आहे. महाविद्यालयाने आजपर्यंत जवळपास दहा हजार पेक्षा जास्त वेगवेगळ्या शाखेतील अभियंते घडविले असून ते भारतातच नव्हे किंबहुना जगात या महाविद्यालयाचे नाव रोशन करीत आहेत. महाविद्यालयाचा अनुभवी उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग,अद्यावत प्रयोगशाळा,भव्य वाचनालय, प्लेसमेंट व रोजगार सेल, सुसज्ज क्रीडा मैदान हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे.
महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांकरता दरवर्षी मॉक टेस्टचे आयोजन करण्यात येत असते, जेणेकरून या विभागातील विद्यार्थ्यांना एमएससीईटीच्या ऑनलाईन परीक्षा करता सराव मिळू शकतो. त्याचबरोबर महाविद्यालयाने ऑनलाईन परीक्षा केंद्र सुद्धा स्थापन केले आहे, ज्याची परीक्षा क्षमता 400 विद्यार्थी आहे. या द्वारे महाराष्ट्र शासन, शासकीय संस्था व खाजगी संस्थांच्या विविध परीक्षेचे आयोजन उत्कृष्टपणे या केंद्राद्वारे महाविद्यालय करीत आहे. हे केंद्र जिल्ह्यातील सर्वात मोठे ऑनलाईन परीक्षा केंद्र म्हणून नावारूपात आले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
महाविद्यालयात फ्रान्स बेस मल्टिनॅशनल 'कॅप जेमिनी' कंपनीने डिजिटल एकेडमी स्थापन केली आहे,जी या विभागातील कंपनीची एकमेव डिजिटल अकॅडमी असून याद्वारे विद्यार्थ्यांना कंपनीद्वारे प्रशिक्षण व सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संस्थेस यूजीसी व महाराष्ट्र शासन मार्फत उपक्रम राबविण्या करता सातत्याने अनुदान मिळत असते. विद्यार्थ्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या या विविध शैक्षणिक उपक्रमांचा लाभ घेऊन यशस्वी विद्यार्थी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.या पत्रकार परिषदेत यावेळी संस्थेच्या एकंदर माहिती संदर्भात पॉवर पॉईंट सादर करण्यात आले.
या पत्रकार परिषदेत संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, उपाध्यक्ष एड. गजाननराव पुंडकर,कार्यकारणी सदस्य हेमंत काळमेघ, सदस्य प्रा आर एन काळे, डॉ एच डी गावंडे, रामेश्वर बाकडे, महाविद्याल याचे प्रभारी प्राचार्य डॉ पी व्ही थोरात, शिवाजी मुख्य शाखेचे मुख्याध्यापक विजय ठोकळ, सर्व विभाग प्रमुख, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा