stone-pelting-in-ganga-nagar: अकोल्यात आंबेडकर जयंती उत्सवाला गालबोट ; गंगा नगर बायपास परिसरात दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त देशभरात जल्लोष सुरू असताना अकोल्यात मात्र या उत्सवाला गालबोट लागलं आहे. सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास अकोला शहरातील गंगा नगर वाशिम बाय पास जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना काही असामाजिक तत्वांनी वाद घालत एका मोटरसायकलवर दगडफेक केली. या दगडफेकीला प्रतिउत्तर म्हणून दुसऱ्या गटाने देखील दगडफेक केली.




घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी जुने शहर पोलिसांचा ताफा दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी दोन्ही गटाच्या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज केला.  सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी अफवांवर लक्ष देवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अकोला शहर  पोलीस उपअधीक्षक सतीश कुळकर्णी हे घटनास्थळी ठाण मांडून आहेत. तसेच परिसरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.




राम नवमीला देखील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न!


काही दिवसांपूर्वी राम नवमीला देखील जुने शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काही असामाजिक तत्वांनी केला होता. मात्र जुने शहर पोलिसांनी तबोडतोब ऑन स्पॉट कारवाई करीत असामाजिक तत्वांचा हा प्रयत्न हाणून पाडला होता. श्रीरामनवमी शोभायात्रा संपता क्षणी रात्री दहा वाजताच्या सुमारास काही युवकांनी जयहिंद चौक मार्ग परिसरात पाकिस्तान विरोधी नारे लावत वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वेळीच या चार ते सहा टारगट युवकांना ताब्यात घेवून पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले होते. ज्या एरियातील हे मुले होती तेथील काही स्थानिक कार्यकर्ते पोलीस स्टेशनला लागलीच जावून मुलांची बाजू मांडत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडे ठोस पुरावे असल्याने हे समाज कार्यकर्ते गप झाल्याचे कळते. नंतर मात्र पोलीसांनी माणुसकी दाखवत या युवकांचे भविष्य खराब होवु नये यासाठी समज देवून त्यांना सोडले. मात्र भविष्यात असे गैरकृत्य करू नये, असा संकल्प मुलांकडून वदवून घेतला असल्याचे देखील कळते. 


सण उत्सव काळात शहराचे विशेषता जुने शहराचे सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अश्या युवकांचे बोलविता धनी कोण, हे सत्य शोधून काढणे आवश्यक झाले आहे. पोलिसांनी या दिशेने पावले उचलावी, अशी मागणी आता जनमानसातून होत आहे.



व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ⬇️
अकोला पोलिसांचे आवाहन



टिप्पण्या