shri-ram-navami-festival-2025: विश्व हिंदू परिषद श्रीराम नवमी शोभायात्रा: अवघी अकोला नगरी झाली राममय!



ठळक मुद्दे

*राज राजेश्वर मंदिरापासून यात्रेला सुरुवात

*आकर्षक सजीव देखावे

*कालिया मर्दन देखावा पाहण्यासाठी गर्दी

*पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते यात्रेस प्रारंभ

*आमदार साजीद खान पठाण यांनी केले यात्रेचे स्वागत 

* शोभायात्रा बघण्यास भाविकांची प्रचंड गर्दी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : जय श्रीरामच्या घोषात, ढोल-ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या मंजुळ आवाजात आणि भगवे ध्वज पताके तोरणाची सजावट अन् आखीव रेखीव रंगीत रांगोळ्यांनी सजलेल्या मार्गावरून रविवार 6 एप्रिल रोजी सायंकाळी  राजराजेश्वर नगरीतून भव्य श्री राम नवमी शोभायात्रा निघाली. शोभायात्राने अवघी अकोला नगरी राममय झाली होती.



श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने श्रीराम नवमीनिमित्त श्री राजराजेश्वर मंदिरातून ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्राची सुरूवात झाली. प्रारंभी ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरात राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, मंजुषा सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, शोभायात्रा समितीचे सर्वसेवाधिकारी कृष्णा शर्मा, अर्चना शर्मा, समितीचे अध्यक्ष बंटी कागलीवाल आदींनी पूजा व महाआरती केली. यानंतर शोभायात्रेला उत्साहात सुरुवात झाली. शोभायात्रेत सहभागी झालेले आकर्षक चित्ररथ, दिंड्यांनी भाविकांचे लक्ष वेधले. शोभायात्रेत महापुरुषांच्या वेशभूषेत अश्वांवर आरूढ झालेले चिमुकले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 



या शोभायात्रेत रा.स्व. संघाचे विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, माजी आमदार बबनराव चौधरी, आमदार विप्लव बाजोरीया, कांग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ. अभय पाटील, शैलेश खरोटे, माजी महापौर विजय अग्रवाल, माजी महापौर मदन भरगड, रामेश्वर फुंडकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, जयंत मसने, गिरीश जोशी, राजेश्वर संस्थानचे विश्वस्त गजानन घोंगे, राजेश भारती, सूरज भगेवार, हरिश आलिमचंदानी, माजी नगरसेवक विजय इंगळे, सतीश ढगे, गंगादेवी शर्मा, अशोक गुप्ता, वसंत बाछूका, विहिंपचे अध्यक्ष प्रकाश लोढिया, समितीचे कोषाध्यक्ष राहुल राठी, विहिंपचे प्रांत सहमंत्री गणेश काळकर, बजरंग दल प्रांत सहसंयोजक सुरज भगेवार, प्रकाश घोगलिया, समितीचे माजी अध्यक्ष विलास अनासने, रामप्रकाश मिश्रा, ब्रिजमोहन चितलांगे, डॉ. अभय जैन, हरिओम पांडे, संजय दुबे, नीलेश पाठक, अमर कुकरेजा, राजू मंजुळकर, सिद्धार्थ शर्मा, मनीष बाछूका, संदीप निकम, संदीप वाणी, रोशन जैन, विजय डहाके, प्रताप विरवाणी, आकाश ठाकरे यांच्यासह रामनवमी शोभायात्रा समितीचे समस्त पदाधिकारी, सेवाधारी सहभागी झाले होते.








देखावा पाहण्यासाठी गर्दी


कोतवाली चौकातील महाराणा प्रताप बागेसमोर विश्व हिंदू परिषदेच्यावतीने कालिया मर्दनचा चलचित्र देखावा साकारण्यात आला. यमुना नदीतील कालिया मर्दनच्या डोक्यावर भगवान श्रीकृष्णाने नृत्य करीत, त्याला हुसकावून लावण्याचा हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.


आमदार साजिद खान पठाण यांच्यातर्फे स्वागत


अकोला जिल्हा व महानगर काँग्रेसच्या वतीने  यंदा प्रथमच अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात रविवारी सायंकाळी गांधी चौकात श्रीराम नवमी शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार साजिद खान यांनी रामभक्तांवर गुलाबपुष्प पाकळ्यांची उधळण केली. शोभायात्रा समितीचे कृष्णा शर्मा, बंटी कागलीवाल, राहुल राठी , तसेच एडवोकेट मोतीसिंह मोहता, सिद्धार्थ शर्मा आदींचे स्वागत आमदार खान यांनी केले.  यावेळी काँगेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आकर्षक देखावे 


शोभायात्रेत आकर्षक चित्ररथांसह श्रीराम मंदिर हरिहर संस्थान-पालखी व धर्मध्वज, विश्व हिंदू परिषद, राणी सती धाम, वाल्मीकी सेना मित्र मंडळ वाल्मीक चौक, खोलेश्वर क्रांती तरुण मंडळ, श्रीबालाजी परिवार खाटुश्यामबाबा, तपे हनुमान श्रीराम उत्सव मंडळ, हरिहर पेठ-बाल शिवाजी, लहूजी वस्ताद मित्र मंडळ हरिहर पेठ, खंडेलवाल वैश्य समाज आळशी प्लॉट, उत्तर भारतीय युवा मंच, वाल्मीकी समाज मित्र मंडळ, हनुमान आखाडा, अक्कलकोट मित्र परिवार, महर्षी नवल वाल्मीक मातृशक्ती महिला मंडळ, शिवसेना वसाहत बजरंग दल मित्र मंडळ, श्रीराम राज्य सेना मित्र मंडळ, प्रगती गणेशोत्सव मंडळ आदी मंडळे सहभागी झाले होते. मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले.


 

याशिवाय ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ, राधे राधे महिला मंडळ, श्री संत गजानन महिला भजन मंडळ, जयदुर्गा महिला मंडळ व्याळा, योगीराधे भजन मंडळ, जय गजानन महिला भजनी मंडळ, अन्नपूर्णा महिला भजनी मंडळ, जय गजानन महिला मंडळ आदी भजन मंडळांचा शोभायात्रेत सहभाग होता.




विजय नगरातील नवल वाल्मीकी मातृभक्त महिला मंडळाच्यावतीने शोभायात्रेमध्ये महालक्ष्मी, सरस्वती, कात्यायनी मातेचा आकर्षक देखावा साकारण्यात आला होता. हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते.


वीर महाबली ग्रुपच्यावतीने शोभायात्रेतील चित्ररथावर 15 फुटी महाकाय मारूती साकारण्यात आले होते. या मारुतीच्या या भव्य मूर्तीसमोर भाविकानी फोटो, सेल्फी काढण्याचा आनंद लुटला. यासोबतच खोलेश्वर क्रांती तरुण मंडळानेही चित्ररथ साकारला होता.








पालकमंत्र्यांनी घेतले मोठ्या राममंदिरात दर्शन


राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी  श्रीरामनवमीनिमित्त शहरातील मोठ्या राम मंदिरात दर्शन घेतले.


खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, गिरीश जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




टिप्पण्या