murtizapur-railway-station-akl: आमदार हरीश पिंपळे यांचे रेल रोको आंदोलन तूर्तास स्थगित; पाच पैकी तीन गाड्यांना थांबा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : इंग्रजकाळीन रेल्वे जंक्शन असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर रेल्वे स्थानकाच महत्त्व कमी झाल्याचं आरोप करीत भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी 5 रेल्वे गाड्यांना मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी केली होती.



मुर्तिजापूर हे वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील काही गावांकरिता रेल्वे स्थानकासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. 



भाजपाचे आमदार हरीश पिंपळे यांनी पाच रेल्वे गाड्यांना मुर्तीजापुरात थांबा देण्यात यावा, या मागणीसाठी आज रेल रोकोचा इशारा दिला होता. मात्र तीन गाड्यांच्या थांबाच्या संदर्भात रेल्वे विभागाने सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे आजचा रेल रोको आंदोलन स्थगित करण्यात आला असून, या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याशी भेटून हे काम लवकरच मार्गी लावणार असल्याच आमदार हरीश पिंपळे यांनी म्हटले आहे. तर सत्ताधारी पक्षात असलो तरीही नागरिकांच्या सुख सुविधांसाठी लढणार असल्याचंही ते म्हणाले.





मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर अधिकाधिक रेल्वे थांबा मिळावा यासाठी आमदार पिंपळे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मूर्तिजापूर तालुका हा अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा केंद्रबिंदू असून, येथे रेल्वे जंक्शन असल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, नागरिक आणि रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांसाठी रेल्वे सेवा अत्यंत महत्त्वाची आहे.


मूर्तिजापूर आणि आजूबाजूच्या भागातील कारंजा (वाशिम), दर्यापूर (अमरावती), तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना रेल्वे सुविधेचा लाभ होण्यासाठी पाच रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी आमदार पिंपळे यांनी केली होती. यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासनाला थेट रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. या प्रयत्नांना यश मिळत रेल्वे प्रशासनाने पाच पैकी तीन रेल्वेंना मूर्तिजापूर स्थानकावर थांबा देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.




मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक विद्यार्थी अकोला आणि अमरावती येथे शिक्षणासाठी रोज अप-डाऊन करतात. तसेच, अनेक नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी जिल्हा रुग्णालये, मोठ्या दवाखान्यांत जातात. या नवीन रेल्वे थांब्यामुळे विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आमदार पिंपळे यांनी व्यक्त केला.



या निर्णयामुळे मूर्तिजापूर आणि परिसरातील हजारो नागरिकांना थेट फायदा होणार असला, तरी उर्वरित 2 रेल्वेगाड्यांसाठीही थांबा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहो. भविष्यात हा निर्णय मूर्तिजापूर तालुका आणि परिसरातील नागरिकांसाठी मोठ्या स्तरावर फायदेशीर ठरणार असल्याचेही आमदार पिंपळे म्हणाले.




टिप्पण्या