good-friday-celebrate-in-akola: अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा; सजीव देखाव्याने भाविकांचे डोळे पाणावले



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: गुड फ्रायडे (Good Friday) हा ख्रिश्चन धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो येशू ख्रिस्ताच्या क्रूसावर चढवण्याच्या आठवणीने साजरा केला जातो. प्रभू येशू ख्रिस्त यांना सुळावर चढवताना ज्या यातना देण्यात आल्या त्याचं सजीव देखावा आज अकोला शहरातील माउंट कार्मल चर्चच्या आवारात सादर करण्यात आला होता. गुड फ्रायडेच्या दिवशी, ख्रिश्चन लोक प्रार्थना करतात, उपवास ठेवतात आणि येशूच्या दुःखद मृत्यूची आठवण करून घेतात. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना आणि सेवा आयोजित केल्या जातात. यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून चर्च मध्ये प्रार्थना केली. फादर जोसलीन यांनी आपल्या मार्गदर्शनातून विश्वाला शांतीचा संदेश  दिला.





शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये (चर्च) यावेळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त उद्या, रविवारी ख्रिश्चन धर्मीय ईस्टर संडे हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहेत.



प्रभू येशू ख्रिस्तांनी अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात गुडफ्रायडे (उत्तम शुक्रवार) हा सण साजरा केला जातो. अकोल्यातही शुक्रवारी हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 30 चर्चेसमधून प्रार्थनासभांचे सकाळी आणि दुपारी आयोजन करण्यात आले. खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळात आयोजित प्रार्थनासभेमध्ये, प्रभू येशू खिस्तांनी क्रूस खांबावर लटकविण्यात आले असता उच्चारलेल्या सात वाक्यांवर रश्मी परमार, सिनाय कदम, फिलमोन ठाकूर, अमित ठाकूर, मीना बिरपॉल, सारा ढिलपे, रेव्हरंड निलेश अघमकर यांनी बायबलमधील विविध वचनांचा आधार घेत प्रकाश टाकला. यामध्ये यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी अमित ठाकूर, राजेश ठाकूर, यशवंत ठाकूर, शीतल ठाकूर, फिलमोन ठाकूर, वैशाली डोंगरदिवे, वंदना गजभिये यांनी गुडफ्रायडेवर आधारित गीते सादर केली. संचालन वैशाली डोंगरदिवे यांनी केले.


गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र लेन्थ महिना सुरु होता. या चाळीस दिवसांच्या काळात ख्रिश्चन बंधू-भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात. घरोघरी कॉटेज प्रेअर्सचे आयोजन केले जाते. गुरुवारी मौंदी गुरुवारनिमित्त प्रार्थनासभा होते. गुडफ्रायडेच्या दिवशी या उपवासांची सांगता होते. 


ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम


दरम्यान, रविवारी प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त जगभरात ईस्टर संडे हा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी बेथेल सेव्हिअर्स चर्चच्या प्रांगणात शनिवारी रात्रीच एक मोठे रिंगण तयार करण्यात येते. रविवारी पहाटे सहा वाजता अकोल्यातील सर्वच चर्चचे सदस्य तेथे उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी होतात. त्यानंतर चर्चमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.



टिप्पण्या