digambar-korde-murder-case: मुलाचे डोळ्यासमोरच वडिलांची हत्या; तिन्ही आरोपींचा जमानत अर्ज नामंजूर, घटनेपासून आरोपी कारागृहात





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बु. येथे एका सात वर्षीय मुलाचे डोळ्यासमोर त्याचे वडिलांचा दिवसा ढवळया खून करणाऱ्या तीन आरोपींचा जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आज 2 एप्रिल रोजी अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश  बी.एम. पाटील यांनी हिवरखेड पोलीस स्टेशन मधील फाईल वरील अपराध क्रमांक 423/2024 चे कलम 103 (1), 3 (5) भारतीय न्याय संहिता मधील आरोपी योगेश श्रीराम सोळंके, (वय 37 वर्ष), आरोपी नागेश श्रीराम सोळंके (वय 32 वर्ष), आरोपी  श्रीराम सीताराम सोळंके (वय 59 वर्ष) तिघेही (राहणार हिंगणी बु. ता. तेल्हारा, जि. अकोला) यांनी दिवसा ढवळया हिंगणी बु. येथील 35 वर्षीय डिगांबर कोरडे याला लाथा मारून संगनमताने खून केल्याच्या प्रकरणात दाखल केलेला जमानत अर्ज आज 2 एप्रिल रोजी नामंजूर केला आहे. या प्रकरणात हे तिन्ही आरोपी अकोला कारागृहात 28 नोव्हेंबर 2024 पासून बंदीस्त आहेत.


या प्रकरणात सरकार तर्फ सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानत अर्जाला विरोध करतांना न्यायालयात लेखी उत्तर व युक्तीवाद सादर केला की, 30 वर्षीय फिर्यादी पत्नीने हिवरखेड पो.स्टे. ला दि. 28.11.2024 रोजी या प्रकरणात फिर्याद दिली की, फिर्यादी ही हिंगणी बु. येथे एक 7 वर्षीय लहान मुलगा, पती डिगांबर व एक लहान मुलगी यांच्यासह राहते. व मजुरीचे काम करते. फिर्यादीच्या , पतीने गावातील बंडू कोरडे यांच्याकडून 25 हजार रूपये उसने घेतले होते. दि. 27 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजताचे सुमारास फिर्यादीचे पती डिगांबर कोरडे हे बडबड करून ओट्यावर बसून शिव्या देत होते. त्यावेळी फिर्यादीचा 7 वर्षीय अल्पवयीन मुलगा घरी पळतपळत आला व त्याने फिर्यादी आईला सांगितले की, बाबाला छात्यावर बसून बसून मारू लागले. त्यामुळे फिर्यादी धावतचं गावातील गजानन जवंजाळ यांच्या घरासमोर गेली असता, फिर्यादीचे पती डिगांबर कोरडे हे खाली जमीनीवर पडलेले होते. व त्यांच्या छातीवर बसून, श्रीराम सोळंके हे बुक्यांनी मारहाण करित होते. व केस धरून खाली जमीनीवर आपटत होते. तसेच आरोपी योगेश सोळंके व नागेश सोळंके हे डिगांबरच्या गुप्तांगावर, पायात व पोटात लाथा मारीत होते. फिर्यादी व तिचा मुलगा घटनास्थळावर गेल्यावर तेथून श्रीराम सोळंके व त्याचे दोन्ही मुले निघून गेले. त्यानंतर फिर्यादी पत्नीने तिच्या जखमी पतीला ऑटोने सरकारी दवाखान्यात नेले. तेव्हा डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. अशा फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरूध्द हिवरखेड पोलीस स्टेशन येथे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 




या प्रकरणामध्ये सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिले की, आरोपींनी केलेल्या मारहाणीत मृतकाच्या अंगावर एकूण 9 जखमांचा उल्लेख शवविच्छेदन अहवालामध्ये आहे. तसेच या प्रकरणात या खूनाची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार 30 वर्षीय महिला जी मृतकची पत्नी आहे व तिला एक अल्पवयीन मुलगा जो 7 वर्षाचा आहे, त्याने देखील त्याच्या वडीलांचा खून होतांना पाहिले आहे. यासर्व आरोपींनी खूनासारखा गंभीर गुन्हा केलेला आहे. 



या प्रकरणातील आरोपी व फिर्यादी, पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हे एकाच गावात राहणारे असून, या आरोपींना जामीन मंजूर झाल्यास दोन्ही पक्षात पुन्हा वाद निर्माण होवून याच गुन्हयासारखा गंभीर गुन्हा घडून, या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांना हस्ते परहस्ते धमकावू शकतो. या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला असून, दोषारोपपत्र देखील विद्यमान न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे निप्पन्न झालेल्या साक्षीदारांवर आरोपी लोक दबाव आणू शकतात. व त्यांना फितूर करण्याची दाट शक्यता आहे. दोषारोपपत्रामध्ये या आरोपींना शिक्षा होण्याइतपत प्रथमदर्शनी पुरावा या प्रकरणात उपलब्ध आहे.  खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये कायद्यामधे जन्मठेप व फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे हे गंभीर प्रकरण सरकार पक्षातर्फे आरोपींना कारागृहामध्ये बंदिस्त ठेवूनच चालवण्यात यावे. तिन्ही आरोपी कारागृहाच्या बाहेर जमानत वर सूटून आले तर यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जो अल्पवयीन असून फक्त 7 वर्षाचा आहे त्याच्या जिवाला आरोपींकडून धोका निर्माण होवू शकतो. या अल्पवयीन साक्षीदार मुलाचे बयान कलम 183 प्रमाणे विद्यमान प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायाधीश तेल्हारा यांच्या न्यायालयात देखील नोंदवण्यात आले असून त्याने न्यायाधीशांसमोर दिलेल्या या बयानामध्ये देखील तिन्ही आरोपी माझ्या बाबांना मारहाण करीत होते व मी मारू नका मारू नका असे म्हणत होतो व घटनास्थळी उपस्थित त्यावेळी सुनिता आजी आणि बंडू आबा म्हणत होते की, साल्याले मारून टाका जितके पैसे लागतील तितके देतो. आईला बोलावून आणले असता आम्हाला तिथे लोटून देण्यात आले व माझे बाबाला दवाखान्यात नेले तेव्हा डॉक्टर म्हणाले की, तुझे बाबा वारले, असे बयान या 7 वर्षीय प्रत्यक्षदर्शी अल्पवयीन मुलाने विद्यमान प्रथमश्रेणी न्यायादंडाधिकरी न्यायाधीश तेल्हारा यांचे न्यायालयात कलम 186 प्रमाणे या प्रकरणात दिलेले आहे, त्यामुळे तिन्ही आरोपींचा जमानत अर्ज नामंजूर करण्यात यावा, असा युक्तीवाद सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला व दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर कोर्टाने तिन्ही आरोपींचा जमानत अर्ज नामंजूर केला.

टिप्पण्या