akot-sessions-court-order-akl: अल्पवयीन पीडितेवर अत्याचार; आरोपीची पोलीस कोठडीमध्ये रवानगी, अकोट सत्र न्यायालयाचा आदेश

file image 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोट ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एका तेरा वर्षीय अल्पवयीन पीडितेवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा आरोप असलेल्या  युवकाची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्याचा आदेश आज अकोट सत्र न्यायालयालयाने दिला आहे.


अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश वी.एम. पाटील यांनी आज 7 एप्रिल रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे फाईल वरील अप. क्र. 169/2025 कलम 64,65(1),351(2) बीएनएस सहकलम 4,6 पोक्सो अक्टमधील आरोपी सचिन गजानन गोमासे( वय 22 वर्ष रा. मुंडगांव ता. अकोट जि. अकोला) याने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचे प्रकरणात या आरोपींची 9 एप्रिल 2025 पर्यंत पुढील तपास करण्याकरिता पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली आहे.


या प्रकरणात अकोट ग्रामीणच्या सहायक पोलीस उपनिरीक्षक योगिता ठाकरे यांनी आरोपीला 06 एप्रिल 2025 रोजी रात्री आरोपीला अटक करून त्याला पोलीस कोठडीमध्ये पाठविण्याबाबत रिमांड अर्ज सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी अकोट सत्र न्यायालयात दाखल केला. तसेच युक्तीवाद केला की, या प्रकरणातील फिर्यादी 13 वर्षीय पीडितेच्या आईने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी सचिन गोमासे विरुध्द फिर्याद दिला की, तिची 13 वर्षीय पीडिता मुलगी इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत आहे. पीडितेने दिनांक 03 एप्रिल रोजी तिच्या आईला सांगितले की, 09 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12.30 वाजताचे सुमारास ती घरी एकटी असतांना आरोपीने घरात कोणी नाही हे पाहून आरोपी घरात आला व त्याने घराचा दरवाजा लावून घेतला व जबरदस्तीने पीडितेसोबत शारीरिक संबंध केले. पीडितेला धमकी दिली की, कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन व निघून गेला. धमकी दिल्यामुळे पीडितेने कोणाला काहीच सांगितले नाही. 


अल्पवयीन पीडितेला ऑक्टोंबर 2024 पासून मासिक पाळी येणे चालू झाले होते. तिला पाळी आली नाही म्हणून व तिचे पोट दुखत असल्यामुळे आईने मेडीकल शॉपमधून किट आणून चेक केले असता, अल्पवयीन पीडिता मुलगी गर्भवती असल्याचे समजले. त्यामुळे  07 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी आईने अल्पवयीन पीडित मुलीसोबत पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणला येवून आरोपी सचिन गोमासे याचेविरूध्द फिर्याद दिली. तक्रारीवरून गुन्हा नोंद करून आरोपीला 06 एप्रिल 2025 रोजी रात्री अटक करण्यात आली. 



गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. गुन्हयाच्या संबंधाने आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे बाकी आहे. अल्पवयीन पीडिता गर्भवती असल्यास पीडितेचे व आरोपीचे डीएनए सॅम्पल घेणे बाकी आहे. व त्याकरिता आरोपीची पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तीवाद या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर कोर्टाने आरोपी सचिन गजानन गोमासे याची या प्रकरणात  09 एप्रिल 2025 पावेतो पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्याचा आदेश पारित केला आहे.

टिप्पण्या