Bus-skids-near-Bordi-Phata-akl: बोर्डी फाट्या जवळ बसचा थरार; चालक व वाहकाच्या सतर्कतेने 20 प्रवाश्यांचे वाचले प्राण




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोट तालुक्यातील पोपटखेड रोड वरील बोर्डी फाट्याजवळ भुतडा फार्म हाऊस नजिक एस टी महामंडळाच्या (MH.40.N.9893) चालत्या बसला आज रविवार 2 मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र बस चालक व वाहक यांच्या सावधानतेमुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. यातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. परंतु बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.


या बसमधून 20 प्रवासी प्रवास करत होते. बसला आग लागल्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले. चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.  शहानुर- अकोला अशी एसटी महामंडळाची ही बस आहे.


आज सकाळीच शहानुर येथून बस अकोटसाठी प्रवासी घेऊन रवाना झाली होती. पोपटखेड वरून अकोटकडे जात असतानाच याच मार्गावरील बोर्डी फाट्यावर अचानक बसमधून धूर निघत असल्याचे बस चालकाच्या लक्षात आलं.


त्यानंतर बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले. बघता बघता बसने मोठा पेट घेतला. आगीमुळे बस पूर्णतः जळून खाक झाली. प्रवाशांच्या वस्तू तसेच एसटी बसचे आगीत मोठे नुकसान झालं.


बसमधील सर्व खुर्चा आणि इतर वस्तू पूर्णतः जळून खाक झाले. आगीची माहिती आकोटच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत पूर्ण बस आगीच्या तावडीत आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बसचे नुकसान झालं. एसटी बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

एस टी बस खाक; सर्व प्रवासी सुखरूप



टिप्पण्या