mahavitaran-line-staff-protest-: महावितरणचा कणा लाईनमन उतरले रस्त्यावर; सुरक्षा साधनासाठी राज्यव्यापी आंदोलन




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन तर्फे महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ (लाईनमन) कर्मचाऱ्यांचे सुरक्षित साधने मिळण्याकरिता व प्रलंबित ज्वलंत प्रश्न निकाली काढण्याकरिता आज 10 फेब्रुवारी 2025 पासून आंदोलन सुरु करण्यात आले आहे.


महाराष्ट्र राज्यात प्रत्येक घरात वीज पोहोचविण्याचे काम महावितरण कंपनीतील आपल्या सर्वांच्या संपर्कातील तळागाळात कार्यरत असणारे लाईनस्टाफ (लाईनमन) कर्मचारी हे आहेत. आणि आता याच तळागाळात कार्यरत असणारे लाईनस्टाफ (लाईनमन) कर्मचारी यांचे सोबत अन्याय होत आहे. कारण मागील बरेच वर्षापासून त्यांचे दररोज लागणारे सुरक्षा साधने त्यांना व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण मध्ये जवळपास दरवर्षी  छोटे मोठे चार-पाच हजार अपघात होतात. त्यात मोठ्या प्रमाणात लाईनस्टाफ (लाईनमन) यांचे अपघात होऊन मृत्यू होत आहे. असेच काही ज्वलंत प्रश्नाबाबत ठोस निर्णय अद्याप महावितरण प्रशासन तसेच  ऊर्जा मंत्री यांच्या कडे प्रलंबित आहे. त्यामुळे या श्रेणीवर अन्याय होत आहे. त्याकरिता इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन तर्फे ग्राहकांना त्रास न देता महावितरण प्रशासनाला जागे करण्याकरिता वेळोवेळी क्रमबद्ध आंदोलन करीत आहे. तरी देखील महावितरण प्रशासन तळागाळात कार्यरत असणारे लाईनस्टाफ (लाईनमन) कर्मचारी यांच्या सुरक्षेकडे आणि वर्षानुवर्षे प्रलंबित ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशनने आंदोलन पुकारले आहे.




आज सोमवार 10 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता महाराष्ट्र मधील प्रत्येक महावितरण विभागीय कार्यालय समोर भव्य द्वार सभा घेण्यात आली. अकोल्यातही विद्युत भवन समोर आंदोलकांनी द्वार सभा घेतली.


येत्या 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता महाराष्ट्र मधील प्रत्येक महावितरण मंडळ कार्यालय समोर थाळी नाद आंदोलन करण्यात येणार आहे.


24 फेब्रुवारी  पासून प्रत्येक महावितरण परिमंडळ कार्यालय समोर लाईनमन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.


या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे महावितरण ग्राहक म्हणजे महाराष्ट्र मधील जनतेच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. जनतेला कोणताही त्रास लाईनमन लाईनस्टाफ देणार नाहीत, अशी माहिती यावेळी सर्कल संघटक राम शेगोकार यांनी दिली.



आंदोलनात वसंत धर्मे, निलेश चाहकर,

किशोर वायकर,  राम रोगाकार,

सुधीर भातखडे, संतोष अकोत, उमेश सावंत, विनोद सुल्ताने आदींसह शेकडो पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले आहेत.

टिप्पण्या