gajanan-maharaj-shegoan-akl: संत गजानन महाराजांचा जयजयकार साता समुद्रापार ;शिंदे दाम्पत्यानी साजरा केला प्रकट उत्सव

फिनलंड येथे “गण गण गणात बोते” चा नाद




प्रा. वंदना शिंगणे

अकोला: संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन दरवर्षी विदर्भासह अवघ्या महाराष्ट्रात माघ शुद्ध सप्तमीला  उत्साहात साजरा केला जातो.   यादिवशी संत नगरी शेगाव येथे महाराजांचे भक्त देश विदेशातून दर्शनासाठी हजेरी लावतात. मात्र जे शेगावी प्रत्यक्ष येवू शकत नाही. ते आपल्या परीने प्रकट उत्सव घरीच साजरा करतात. असेच युरोपीय खंडातील फिनलंड येथे वास्तव्यास असलेले अकोला येथील शिंदे दाम्पत्यानी महाराजांचा प्रकट उत्सव रविवार ८ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा केला. श्रींची पूजा अर्चना करुन महाप्रसाद वाटप केला.



अकोला जिल्ह्यातील निखिल शिंदे  आणि त्यांच्या धर्मपत्नी दीपिका सोनार शिंदे फिनलॅन्ड येथील ह्युविंका शहरात नोकरी निम्मित वास्तव्यास आहेत. शिंदे दाम्पत्य भारतीय संस्कृती जपत प्रत्येक सण उत्सव साजरे करतात. त्याच उत्साहात रविवारी संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा करीत,  या आनंदात त्यांनी तेथील भारतीयांना देखील सामील करून घेतले.



ब्रह्मांड नायक संत गजानन महाराज


शेगावीचा राणा संत श्री गजानन महाराज यांची कीर्ती सर्वश्रुत. २३ फेब्रुवारी १८७८ रोजी श्री गजानन महाराज महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतात, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दिगंबर अवस्थेत पहिल्यांदा भक्तांना दिसले. ती तिथी माघ वद्य सप्तमी असल्याचे म्हंटल्या जाते. कोणतेही अवडंबर न करता केवळ भक्तिमार्गाने ईश्वराशी एकरूप होवू शकतो, असे महाराज म्हणत. महाराजांनी "गण गण गणात बोते" हा मंत्र भक्तांना दिला. त्यांचा हा मंत्र आजही जगभरातील भक्ताच्या ओठावर आहे. 


महाराजांचा आवडता नैवेद्य


श्री गजानन महाराजांना पिठलं-भाकरी (झुणका-भाकर), अंबाडीची भाजी, मुळ्याच्या शेंगा, हिरवी मिरची (ठेचा) आवडायचे असे म्हणतात. आजही शेगाव संस्थानमध्ये प्रकटदिन व इतर उत्सवात या अन्न पदार्थांचा महाप्रसाद दिला जातो. तसेच दररोज लाखो भक्तांसाठी येथे अन्नछत्र सुरू असते. महाराजांनी अन्न वाया घालू नये. जेवढे पोटाला लागेल तेवढेच खावे, असे सांगितले आहे. महाराज उष्ट्या पत्रावळीतील अन्न सेवन करताना त्यावेळी लोकांना दिसले होते. याचा उल्लेख ग्रंथात देखील आहे. या प्रसंगा वरूनच महाराजांनी अन्नाचे महत्त्व भक्तांना सांगितले आहे. महाराजांच्या  नैवेद्यात आज देखील साधेपणा व ग्रामीण चव महत्त्वाची मानली जाते.



“गण गण गणात बोते” नाद मनात

गण गणात बोते' अर्थात प्रत्येकामध्ये परमेश्वर बघा, असा या मंत्राचा अर्थ आहे. अशा या मंत्राला आणि हा मंत्र देणाऱ्या संत गजानन महाराजांच्या भक्तीला कुठल्याही सीमा नाहीत. यामुळे सातासमुद्रापार फिनलॅन्ड येथे नोकरी निमित्ताने गेलेल्या शिंदे दांपत्यानी संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा आपल्या घरी मोठ्या भक्ती भावाने साजरा केला.


शेगाव मनात साठवलं



“शेगावचे ते मंदिर, तिथे होणारा टाळ-मृदंगाचा गजर आणि 'गण गण गणात बोते' चा तो नाद आम्ही मनात साठवला आहे.  हा नाद आजही लाखो भक्तांना जगण्याचे बळ देतो.”  

  • निखिल शिंदे 




गोड शिरा आणि गजानन महाराजांचा संदेश


“महाराजांच्या प्रसादासाठी गोड शिरा बनवून येथील भारतीयांच्या घरी नेवून दिला. प्रसादाच्या बॉक्सवर "गण गण गणात बोते" ही ओळ लिहली. यामुळे येथील विशेषतः वैदर्भीय लोकांना शेगावात असल्याची भावना निर्माण झाली. सर्वांनी मिळून प्रसादाचा लाभ घेतला.”

  • दीपिका सोनार शिंदे 

टिप्पण्या