भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अमरावतीनंतर आता अकोला जिल्ह्यातही बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. अकोला जिल्ह्यातून तब्बल 15 हजार 845 बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचे सोमय्या यांनी नमूद केलं आहे. याबाबात सोमय्या यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मिडिया ॲप्लिकेशन वरील अकाउंट वर पोस्ट केली आहे.
आपल्या आरोपांना दुजोरा देण्यासाठी सोमय्या यांनी अकोला जिल्हाधिकारी यांच्या कडून मंत्रालयाला पाठविलेल्या पत्राचा आधार घेतला आहे. अकोला जिल्ह्यातून देण्यात आलेल्या जन्म प्रमाणपत्रांचा तपशिल महसूल व वन विभागानं मागविला होता. अकोल्यातून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची माहिती मंत्रालयातून मागविण्यात आली होती. याच माहितीचा आधार किरीट सोमय्या यांनी घेतला आहे.
अशी आहे पोस्ट
अकोला जिल्हात 15,845 बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा
अकोला 4849
अकोट 1899,
बाळापूर 1468
मुर्तिजापूर 1070
तेल्हारा 1262
पातूर 3978
बार्शिटाकळी 1319
बनावटी दस्तावेज द्वारा अकोला जिल्हा येथे जन्म झाल्याचे प्रमाणपत्र/दाखला मिळविला.
असं त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये नमूद केले आहे.
बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम अकोला, अमरावती या जिल्ह्यांपर्यंत आलेच कसे, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. अकोला तहसील कार्यालयातून 4 हजार 849 प्रमाणपत्र देण्यात आल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. अकोटमधून 1 हजार 899 बनावट जन्म प्रमाणपत्र रोहिंग्या मुस्लिमांना दिल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे. बाळापुरातून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संख्या 1 हजार 466 आहे. मूर्तिजापूर तालुक्यातून 1 हजार 70 बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. पातूर तालुक्यातून 3 हजार 978 आणि बार्शिटाकळीतून 1 हजार 319 जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे.
किरीट सोमय्या यांनी दिलेली ही आकडेवारी एका सरकारी पत्रातील आहे. मात्र यात कुठेही बनावट जन्म प्रमाणपत्र किंवा रोहिंग्या मुस्लिमांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांचा उल्लेख नाही. अकोला जिल्ह्यातून देण्यात आलेल्या एकूण जन्म प्रमाणपत्रांची ही एकत्र माहिती असल्याचं प्रशासनानं पत्रात नमूद केलं आहे. एकूण अर्जापैकी 107 अर्ज फेटाळण्यात आल्याचंही अकोला जिल्हा प्रशासनानं पत्रात म्हटलं आहे. अद्यापही 4 हजार 844 अर्ज प्रलंबित आहेत. एकूण प्राप्त 15 हजार 845 अर्जापैकी 10 हजार 273 जणांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मात्र सोमय्या यांनी 15 हजारावर बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आपला आरोप कायम ठेवला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा