savita-tathod-murder-case-akl: सविता ताथोड हत्याकांड: आरोपी धीरज चुंगडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या जुना हिंगणा परिसरात मंगळवारी पहाटे मॉर्निंग वॉक करिता गेलेल्या महिलेची किरकोळ कारणामुळे हत्या झाल्याची घटना घडली होती. घटनास्थळावरून आरोपीने पळ काढला होता. त्याला काल बुधवारी पोलिसांनी अटक केली होती. आज गुरुवारी या हत्याकांडातील मुख्य आरोपी धीरज चुंगडे याला न्यायालय समक्ष हजर केले असता, त्याला सोमवार 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



किरकोळ वादातून आरोपी धीरज चुंगडे याने शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या हत्येतील आरोपीला अटक करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अधिनस्त विशेष पथकाच्या कर्मचाऱ्यांना दिले होते. आरोपीला पकडण्यासाठी पथक सक्रियपणे शोधत होते. दरम्यान, आरोपी चांदूरजवळील सुकडी गावात दिसल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकातील राज चंदेल, नदीम शेख, जुने शहर पोलीस ठाण्यातील छोटू पवार, सागर सिरसाट यांनी तत्परता दाखवत आरोपीचा पाठलाग करून त्याला काल पकडले होते.




अकोल्यातील जुना हिंगणा परिसरात शेजारी राहणाऱ्या दोन जणांच्या किरकोळ वादातून एका महिलेची हत्या झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. सविता ताथोड असे 48 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. मृतक सविता ताथोड आणि त्यांचा मारेकरी धीरज चुंगडे यांच्या मध्ये दोन महिन्याआधी किरकोळ वाद झाला होता. या वादात आरोपीच्या आईचा देखील समावेश असल्याचे कळते. या वादात मृतक महिलेने आरोपीच्या आईच्या गालावर थापड मारली होती. या अपमानाची खुन्नस आरोपीने सविता ताठोड यांना जिवानिशी मारून काढली. आरोपीने थंड डोक्याने कट रचून सविता यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या दैनंदिन कामावर लक्ष ठेवून होता.



दरम्यान मंगळवारी सविता ताथोड या पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक करिता गेल्या असता, त्यांच्या मागावर दुचाकीने गेला. संधी मिळताच आरोपी धीरजने घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर सविता ताथोड यांना अडवून कापडाने गळा आवळला आणि खाली पाडले. आणि चाकूने त्यांच्यावर वार केले. त्यांच्यासोबत असलेल्या महिला आणि तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ताथोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने ताथोड यांचं डोकं रस्त्यावर आपटून त्यांना रक्तबंबाळ केलं. काही वेळातच सविता ताथोड यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने येथून पळ काढला, असा घटनाक्रम समोर आला.



घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. काल बुधवारी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.आज गुरुवारी आरोपी धीरज याला अकोला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.



टिप्पण्या