mismanagement-in-the-AMC: महापालिकेतील गैरकारभाराची लवकरच पोलखोल करणार ; आमदार पठाण यांनी पत्रकार संवाद बैठकीत दिला ईशारा





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत अकोला महापालिकेत प्रशासक राज आहे. या प्रशासक काळात प्रशासनाच्या आड संपूर्ण महापालिका कोण चालवीत आहे हे सर्वश्रुत असून आगामी काळात महापालिकेत सुरू असलेल्या गैरकारभाराची पोलखोल करणार असल्याचा इशारा आ. साजिद खान पठाण यांनी शनिवारी आयोजित पत्रकार संवाद बैठकीत दिला. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे, मो. इरफान, महेंद्र गवई यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 



शनिवारी आ. साजिद खान यांच्या वतीने पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संवादात शहर विकासाबाबत अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा करण्यात आली. आधी नगरसेवक, विरोधी पक्षनेते पदी असताना आपण महापालिकेत केलेली कामगिरी याकाळात पत्रकार बंधू भगिनींनी दिलेली साथ याचे आपण सदैव कृतज्ञ असल्याचे प्रतिपादन आ. पठाण यांनी यावेळी केले. 





गेल्या महिन्यात आपण आमदार पदाची सूत्रे स्वीकारताच जेव्हा कामकाजाला सुरुवात केली, त्यावेळी आपल्या समोर अनेक गंभीर प्रकरणे आली आहे. विविध विभागांचे दौरे केल्याने अनेक विभागात सुरू असलेला गैरकारभार आपल्या समोर आला आहे. महापालिका ही कर्मभूमी असल्याने महापालिकेची खोलवर माहिती जाणून घेतली असता प्रशासक काळात महापालिकेत सुरू असलेल्या गैरकारभाराच्या अनेक तक्रारींचा पाढा आपल्या समोर मांडला असल्याचे आ. पठाण यांनी सांगितले. 




तर प्रशासकाच्या हा सर्व गैरकारभार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याची ख्याती महानगरातील संपूर्ण नागरिकांना सर्वश्रुत असल्याचा सणसणीत टोला सुद्धा यावेळी लगावला. 



नुकतेच आकृतीबंधच्या नावाखाली मानधन तत्त्वावर असलेल्या काहींना महापालिकेत कायम रुजू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत कागदपत्रे सुद्धा आपल्या हाती लागली असून लवकरच या गैरकारभाराला आपल्या समोर आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 




यासोबतच महापालिकेत सुरू असलेल्या अनेक गैरकारभारांची पोलखोल करणार असल्याचे प्रतिपादन आ. पठाण यांनी केले.

टिप्पण्या