chinese-manja-kills-one-akola: चायनीज मांजाने अकोल्यात घेतला एकाचा बळी; चार गंभीर जखमी, मांजा विक्रेता व पतंगबाजांवर गुन्हे दाखल होणार काय?





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आज मकर संक्रांतीच्या दिवशी चायनीज नायलॉन मांजाने अकोला शहरात खळबळ उडाली आहे. चायना मांजाने एका व्यक्तीचा गळा चिरून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर चार गंभीर जखमी झाले आहेत.


अकोला शहरात आज सकाळपासून पतंग उडविण्याच्या मस्तीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी चारजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दरम्यान, नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय समोरील उड्डाणपूल वरून खाली उतरतांना गळ्यात चायनीज मांजा अडकल्याने किरण प्रकाश सोनोने या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.




मागील काही वर्षापासून चायनीज मांजा बाजारात खुलेआम विक्री होत असून, निष्कारण निष्पाप व्यक्तींचा यात बळी जात आहे. शिवाय  प्राणी पक्षी यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. जिल्हा व पोलीस प्रशासन केवळ विक्रेत्यांवर थातुर माथूर कारवाई करून वेळ मारून नेतात. अश्या चायनीज मांजा वापरून पतंग उडविणाऱ्या मस्तीखोर लोकांवर देखील कडक कारवाई व्हायला पाहिजे. या संबंधित सर्व लोकांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, अशी मागणी आता जनमनसातून जोर धरू लागली आहे.



आज संभाजी नगर येथे देखील चायनीज मांजामुळे एक पोलीस अधिकाऱ्याचा  मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. अकोल्यात देखील एक पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याचे कळते. एवढे होऊनही पोलीस प्रशासनाला खडबडून जाग आलेली नाही, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.



तर दुसरीकडे या चायनीज मांजामुळे आज अनेक भागातील विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत होता. तसेच केबल टीव्ही संच देखील बंद पडत होते. अनेक ठिकाणच्या विद्युत वायर, केबल या मांज्यामुळे अक्षरशः तुटल्या तर काही ठिकाणी खाली लोंबकळल्या. हा घातकी मांजाची विक्री व निर्मिती पूर्णपणे बंद होण्यासाठी शासनाने कायम स्वरुपी तोडगा काढावा,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



येत्या दोन दिवस नागरिकांनी चेहऱ्यावर रुमाल किंवा गमचा बांधून निघण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच घातक चायनीज मांजाची विक्रेत्यांनी हा मांजा विकू नये आणि  हा मांजा लावून पतंग उडवू नये, आढळल्यास  विक्रेता आणि पतंगबाजांवर कडक कारवाई करण्यात येईल. असे कुठले ही कृत्य करु नका ज्यामुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात येईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टिप्पण्या