mla-sajid-khan-akl-take-oath: शपथ घेताच आमदार साजिद खान शिवरायांच्या चरणी नतमस्तक




ठळक मुद्दे 

*शपथ विधीसाठी सहपरिवार पोहचले विधानभवनात  


*आई सलमा मन्नान खान यांनी साजिद खान यांना लावला आमदारचा बिल्ला 




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांनी शनिवारी आपल्या आमदारकीची शपथ घेतली. यावेळी शपथ घेतल्यावर आ. पठाण हे आपल्या संपूर्ण कुटुंबीयासमवेत थेट विधानभवनात असलेल्या छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचत त्यांनी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. त्यांच्या या कृतीचे विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी सह सत्तापक्षातील लोकप्रतिनिधींनी यावेळी कौतुक केले. 


गुरुवारी सायंकाळी सरकारची शपथविधी मुंबई येथील आझाद मैदानावर पार पाडली. शुक्रवारी सत्ता पक्षातील आमदारांनी शपथ घेतली तर दुसरीकडे विरोधी पक्षातील आमदारांनी या शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. शनिवारी मात्र विरोधी पक्षातील सर्वच नवनिर्वाचित आमदारांची शपथ विधी पार पाडली. 



यावेळी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांची सुद्धा शपथविधी पार पाडली. यावेळी शपथ घेताच साजिद खान यांनी ' जय भीम जय जिजाऊ' चा जयघोष सभागृहात केला. तर शपथ विधी आटोपताच त्यांनी विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सहपरिवार नतमस्तक होत अभिवादन केले. 



यावेळी त्यांच्या परिवारातील सर्वच सदस्य तेथे उपस्थित होते. तर त्यांची आई सलमा मन्नान खान यांनी साजिद खान यांना आमदारचा बिल्ला लावला. यावेळी उपस्थितांना प्रतिक्रिया देताना आ. साजिद खान यांनी मतदारसंघातील समस्त मतदारांचे आभार मानले. तर त्यांच्या या कृतीने जातीवादाच्या नावावर अपप्रचार करणाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे हे विशेष ! 



 


'जय भीम जय जिजाऊ' चा जयघोष 


पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान यांनी शपथ घेताना  सभागृहात 'जय भीम जय जिजाऊ'चा जयघोष केला. त्यांच्या या घोषणेने संपूर्ण सभागृह दणदणीत झाले होते. 


 


सामान्य कुटुंबातील साजिद झाले आमदार 


पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान यांना कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही. अगदी सामान्य कुटुंबातून आलेले तसेच निवडणूक जिंकल्यावर राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणून साजिद खान प्रकाशझोतात आले होते. नगरसेवक ते आमदार असा हा साजिद खान यांचा प्रवास वाखाणण्याजोगा असून सामान्य कुटुंबातील व्यक्ती सुद्धा आपल्या जिद्द व मेहनतीच्या जोरावर आमदार बनू शकतो हे दिसून आले आहे. 





आ. साजिद खान यांचा राजकीय प्रवास 


सामान्य कुटुंबातील असलेले साजिद खान यांचा राजकीय प्रवास मोठा संघर्षमयी असा आहे. सन 2007 मध्ये साजिद खान हे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2012 मध्ये पुन्हा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. यावेळी त्यांनी बांधकाम विकास समितीचे सभापती, स्टँडिंग सभापती म्हणून त्यांनी कार्य पाहिले. या कार्यकाळात त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेत विकासकामे केली. तर दाणा बाजार येथील व्यावसायिक असो की लघु व्यावसायिक यांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या. त्यानंतर त्यांनी मनपाचे विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका पार पाडली. सन 2017 मध्ये साजिद खान तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून असताना त्यांनी भाजपाने लादलेली अवाजवी करवाढ याचा सभागृहात तीव्र विरोध नोंदविला. यावेळी त्यांना सभागृहाच्या कार्यवाहीला सुद्धा सामोरे जावे लागले होते. तरी मात्र कुठल्याही कार्यवाहीला बळी न पडता त्यांनी आपली जनसेवा सुरूच ठेवली. तर सन 2019 मध्ये पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघात त्यांचा निसटता पराभव झाला होता. तरी मात्र या पराभवाने न खचता त्यांनी आपली जनसेवा सुरू ठेवत सामान्यांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी सभागृहात आवाज उठविलाच. 2007 ते आजपावेतो त्यांनी पक्षातही अनेक मानाची पदे भूषविली आहे. महासचिव, उपाध्यक्ष, बूथ कमिटीचे विभागीय समन्वयक, मध्यप्रदेश, नागपूर, सिंदखेड राजा यासह अनेक ठिकाणी निरीक्षक म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.  आता सन 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठे यश संपादन करीत ते आमदार म्हणून निवडून आले.





टिप्पण्या